आमदाराची लेक दाखल झाली आश्रमशाळेत…..

0
1418

देवरी,दि.०२ः शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे देवरी आमगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या मुलीचे नाव आठव्या वर्गात दाखल करून एक नवीन इतिहास घडविला आहे.यापूर्वी सुद्धा आमदार पुराम यांनी आपला मुलगा बिरसालाही शासकीय आश्रम शाळा पुराडा येथे दाखल केले होते.आमदारांनी आपल्या दोन्ही मुलांना आश्रमशाळेत शिकविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे हे विशेष.
आमदाराची कन्या शासकीय आश्रम शाळा येथे दाखल झाल्यावर प्रकल्प अधिकारी उमेश काशीद व प्राचार्य कमल कापसे यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आदिवासी विकास विभाग अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम दिनांक 27 जूनला झाले.त्यावेळी शासकीय आश्रम शाळा पुराडा येथे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी त्यांची मुलगी समृद्धी हिचे स्वतः प्रवेश फार्म भरून वर्ग आठवीत दाखल केले.आपल्या मुला-मुलींना शहरातील मोठमोठ्या सीबीएससी शाळेत, काॅंन्वेटमध्ये शिकविण्याचे ध्येय उराशी बाळगून नाहक पैसे खर्च करतात.समाजामध्ये आपल्या मुलांना कॉंन्वेंट मध्ये शिकवित असल्याचे दाखवून मिरवतात.परंतु ह्या सर्व बाबींना तिलांजली देत आमदार संजय पुराम यांनी आपल्या दोन्ही मुलांना शासकीय आश्रम शाळा पुराडा येथे दाखल केले.

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे प्रवेशोत्सव प्पर आयुक्त आयुष्यी सिंग यांच्या प्रेरणेने व प्रकल्पाधिकारी उमेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.प्रवेशोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एक अनोख्या पद्धतीने नवप्रवेशित बालगोपालांना अत्यंत चैतन्यमय वातावरणात, उत्साहात अनेक प्रकारच्या विविध रंगी वेशभूषेतून विद्यार्थ्यांना टोपी,चॉकलेट, स्कूल बॅग,पुस्तके व भेटवस्तू देऊन त्यांचे सेल्फी विथ सक्सेस घेऊन अत्यंत आनंददायी वातावरणात पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राचे पुजन करून उद्घाटन केले.त्यानंतर प्रास्ताविकेत आश्रमशाळेचे प्राचार्य कमल कापसे यांनी आपल्या शाळेतील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.तसेच विद्यालयाची बलस्थाने सांगत शाळेतील श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम यावर्षी संपूर्ण नागपूर विभागातून बारावी विज्ञान शाखेतून प्रथम व नीट परिक्षेत संपूर्ण भारतात आदिवासी गटात 95 व्या रँक वर पहिल्याच प्रयत्नात पास झाली ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.यावेळी आमदार संजय पुराम यांनी सांगितले की मी सुद्धा आश्रम शाळेत शिकून आज आमदार झालो.म्हणून आश्रमशाळेची महिमा ही विद्यार्थी घडवण्याची असून आदिवासी विद्यार्थ्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने व आत्मियतेने स्वतः एक लक्ष ठरवून आश्रमशाळेमध्ये अध्यापन केले पाहिजे.त्यांचे भविष्य आश्रम शाळेत अत्यंत उज्वल आहे.मी माझ्या समाजासाठी सदैव सेवा देण्यास तत्पर आहे.यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.पंचायत समिती सदस्य वैशालीताई पंधरे यांनी पालकांना आपल्या पाल्यांना नियमितपणे शाळेत पाठवाल तरच त्यांचे उद्धार होईल तसेच मी सुद्धा आश्रम शाळेचीच विद्यार्थिनी आहे असे सांगितले.पंचायत समिती सदस्य ममताताई अंबादे,पुराडाचे सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पुराडा व ढिवरीनटोला चे पोलीस पाटील सुभाष अंबादे यांनी विद्यार्थ्यांना असलेल्या सवयी विषयी खर्रा व मोबाईल ह्या व्यसनापासून दूर राहण्याचे आश्वासन आवाहन केले.त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण टप्पे,केंद्रप्रमुख दसाराम लाळे,सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहता,डॉ. मेघावी घरडे,पुराड्याचे उपसरपंच रामेश्वर आचले, ढिवरीनटोल्याचे उपसरपंच भोजराज मडावी, प्रकल्प कार्यालय देवरीचे आदिवासी विकास निरीक्षक कपील शर्मा,मंडळ अधिकारी ब्राह्मणकर,पुराडाचे पटवारी उईके, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मंगलाताई वट्टी, शोभेलाल उईके,रामेश्वर करचाल,जयाताई बैस तसेच मोठ्या प्रमाणात पालक मंडळी व पाहूने उपस्थित होते.शाळेतील प्रा. संदीप बिसेन व माध्यमिक शिक्षिका सुजाता मेश्राम यांनी पालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण केले. पालकांनी यावेळी विविध प्रकारच्या समस्या सांगितल्या त्यावर प्राचार्य कमल कापसे व इतर शिक्षकांनी त्यांचे निराकरण केले ,कार्यक्रमाच्या सुरुवातीला याप्रसंगी आमदार संजय पुराम व प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्या हस्ते हस्तकला व विविध कला कौशल्याने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुसंग्रहाचे उद्घाटन करण्यात आले.दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आमदार व प्रकल्प अधिकारी तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ऑल इंडिया रँक मध्ये प्रथम आलेल्या श्रुती मरकामचे सुद्धा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. मेघा धोपटे व पवन वंजारी यांनी तर आभार प्रदर्शन विजय टेंभरे यांनी केले.