
कवलेवाडा येथे अतिवृष्टीमुळे घर कोसळले
गोंदिया, दि. 8 : गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून जिल्ह्यात 110.6 मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर धरणाचे दोन गेट 3 फूट उंचीपर्यंत उघडण्यात आले असून, यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी देखील सतर्क रहावे. जिल्हा प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहे.
बंद करण्यात आलेले मार्ग पुढील प्रमाणे आहे. केशोरी हद्दीतील: वडेगाव ते खोलदा, दिनकरनगर ते करांडली, प्रतापगड ते कडोली, प्रतापगड ते रामनगर, इलदा ते वडेगाव. नवेगावबांध हद्दीतील: रामपुरी गावादरम्यान असलेल्या पुलावर पाणी आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. देवरी हद्दीतील: चीचेवडा ते मुर्दोली, डवकी ते शिलापुर, गोटाबोडी ते बोरगाव, शेडेपार रस्ता. चीचगड हद्दीतील: निलज, घोंनाडी, सिंगांडोह-रोपा नाला, ककोडी/चिलाटी नाला, परसोडी जवळ (चीचगड–देवरी रोड). अर्जुनी मोरगाव हद्दीतील: बोरी ते मांडोखाल, कोरंबी टोला ते मांडोखाल, सिलेझरी ते येरंडी (विहीरगाव), महागाव, शिरोली, ईटखेडा, बोंडगाव/देवी ते खांबी आणि चान्ना ते बोंडगाव/देवी मार्ग काही वेळात बंद होण्याची शक्यता. आमगाव हद्दीतील : किंडगीपार ते जवरी, किंडगीपार ते शिवनी, जामखारी ते धावडीटोला, कालीमाटी ते सुपलीपार, सुपलीपार पाटीलटोला ते मोहगाव रस्ते बंद झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व पूरग्रस्त मार्गांवरील प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील मौजा कवलेवाडा येथे आज दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे पुष्पाबाई अमृतलाल पटले यांचे राहते घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले असून, कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





