
गोंदिया, ता. ८ जुलै : गोंदिया जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये घर व शेतीविषयक मालमत्तेचे अंशतः नुकसान झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.मुंडीकोटा येथील महमुनिशा मुबारक शेख यांच्या गुरांच्या गोठ्याची भिंत आज दुपारी २:०० वाजता पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
त्याचप्रमाणे, मौजा बोर येथील सहेसराम कापसे यांच्या घराचे काही भाग पडल्याने घराचे अंशतः नुकसान झाले आहे. करटी बु. येथील देवेंद्र धनराज अंबुले यांचे घरही आज झालेल्या जोरदार पावसामुळे अंशतः ध्वस्त झाले आहे.दरम्यान, मौजा पांजरा येथील महेंद्र अनंतराम नंदागवळी यांच्या शेतातील कुकूटपालन शेड दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास पडल्याची घटना घडली. यामुळे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.तसेच, बिरोली येथील सरस्वती कुबडे यांच्या घराचे देखील अंशतः नुकसान झाल्याचे वृत्त आहे.या सर्व घटनांबाबत स्थानिक प्रशासनाने पंचनामे प्रक्रिया सुरु केली आहे.





