
तिरोडा,दि.१३ः पोवारी बोली, मराठी तथा हिंदीचे सुप्रसिद्ध कवी अँड. देवेंद्र चौधरी यांच्या पोवारी बोलीतील कवितासंग्रह “पेंडी” ह्या पुस्तकाला ‘स्व.सौ.कमलाबाई कटरे साहित्य पुरस्कार-2024’ प्राप्त झाला आहे.तिरोडा तालुक्यातील मेंदीपूर येथील रहिवासी असलेले एड.देवेंद्र चौधरी यांना राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
आज,(दि.13)रोजी त्यांना आमगाव तालुक्यातील साहित्यकांचे हित जोपासणारी “आधारक सर्वांगीण समाजविकास बहुद्देशीय संस्था,बोरकन्हार (र.नं.महा/754/04),”तर्फे भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत साहित्य अकादमी या शासकीय संस्थेचे “ग्रामालोक” या कार्यक्रम निमित्ताने आयोजित कविता वाचन कार्यक्रमात कवी देवेंद्र चौधरी यांना त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी आणि पोवारी बोलीसाठी करीत असलेल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आर.डी.एस.हायस्कूल तथा ज्युनिअर काॅलेज,बोरकन्हार, (तह.आमगांव, जि.गोंदिया) बहुप्रतिष्ठित ”स्व.सौ.कमलाबाई कटरे साहित्य पुरस्कार-2024” या साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कारात त्यांना रोख, सुंदर सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या “पेंडी” हा काव्यसंग्रह अमेझॉन, फिल्पकार्ड वर देखील उपलब्ध आहे.कवी चौधरी यांच्या पोवारी बोली, हिन्दी आणि मराठी भाषेत एकूण 5 पुस्तक प्रकाशित झालेल्या आहेत. पोवारी बोलीतील पेंडी ही प्रथम साहित्यकृती आहे की, तिला पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रा.अरविंद कटरे होते.विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक अँड.लखनसिंह कटरे,साहित्यिक युवराज गंगाराम, प्रा. मिलिंद रंगारी, इंजि.गोवर्धन बिसेन,पवन पाथोडे आणि आमगाव तसेच बोरकन्हार येथील प्रतिष्ठीत नागरिक आणि शालेय विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पवन पाथोडे यांनी केले तर आभार आर.डी.एस. हायस्कूल तथा ज्युनिअर काॅलेज, बोरकन्हार प्राचार्य उमेशकुमार कटरे यांनी मानले.





