35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home यशोगाथा देवरीच्या सुहानीची ‘अमेरीकेच्या आकाशात भरारी’

देवरीच्या सुहानीची ‘अमेरीकेच्या आकाशात भरारी’

0
100

blank

गोंदिया,दि.१५:: जिद्द व मेहनतीच्या बळावर मोठ्यात मोठे शिखर गाठून यश प्राप्त करता येते, याची प्रचिती मुळची जिल्ह्यातील देवरी येथील व सद्या गोंदिया शहरातील रहिवासी असलेली सुहानी विजय अग्रवाल या विद्यार्थीनीने पुन्हा एकदा करून दिली आहे.लहानपणी पाहिलेल्या पायलट होण्याच्या आपल्या स्वप्नांना साकार करत सुहानीने थेट अमेरिकेच्या आकाशात झेप घेतली असून ऐतिहासिक कामगीरी करत गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेक्षात मानाचा तुरा रोवला आहे.

आदिवासीबहूल व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यात जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर देवरी तालुका असून सुहानी अग्रवाल ही मुळची देवरी येथील रहिवासी आहे. प्राथमिक शिक्षण देवरी येथे पूर्ण केल्यानंतर वडील गोंदियात स्थायिक झाल्याने इयत्ता १२ वीपर्यंतचे शिक्षण तिने गोंदियात पूर्ण केले. यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुहानीने आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तेथील वैमानिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. दीड वर्ष वैमानिकाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर शनिवार, १२ जुलै रोजी तिला वैमानिकाचा परवाना देण्यात आला. सुहानी देवरी तालुक्यातील पहिली महिला पायलट ठरली आहे. देवरी येथील सुहानीचे काका दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, सुहानीचे लहानपणापासून विमान उडवण्याचे स्वप्न होते आणि आता तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. वडील विजय अग्रवाल सद्या गोंदिया येथे वास्तव्यास असून त्यांनी नेहमीच तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तिला प्रेरित केले आहे. सुहानी १५ दिवसानंतर भारतात परतणार असून तिला भारतात प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. सुहानीच्या यशाबद्दल तिचे आजोबा विष्णू अग्रवाल, वडील विजय अग्रवाल, काका दीपक अग्रवाल, राकेश अग्रवाल यांच्यासह देवरी व गोंदिया येथील कुटूंबातील सर्व सदस्यांनी, मित्रमंडळींनी तिचे अभिनंदन केले आहे.

blank