
गोंदिया : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर १९ जुलै रोजी अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून अध्यक्षपदाकडे नजरा लागल्या आहेत. जिल्हा बँक शेतकर्यांची बँक असून अध्यक्षपदी भुमिपूत्राला संधी देण्यात यावी, अशी मागणी ओबीसी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलु कटरे यांनी केली आहे.
जिल्हा बँक शेतकर्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेच्या सर्वोच्च पदावर शेतकर्याना संधी मिळणे आवश्यक आहे. बँकेच्या अध्यक्षपदी आधी सेवा सहकारी गटातून निवडून येणार्या संचालकास अध्यक्ष होता येत होते. परंतु, काही संधीसाधू राजकारण्यांनी बँकेच्या उपविधीत बदल करून कोणत्याही संचालकास अध्यक्ष येता येईल, असा बदल राज्य सरकारकडून करवून घेण्यात आला. त्यामुळे शेतकर्यांवर पुंजीपती असलेले मुठभर लोकांची वर्णी लागणे सुरू झाली. आता मात्र या वेळेस सर्व संचालकांनी सद्विवेक बुध्दीचा वापर करून भुमिपुत्रास अध्यक्षपदी बसवावे, अन्यथा आपल्या ज्या शेतकर्यांनी आपणास मतदान करून निवडून दिले, ते आपणास माफ करणार नाही, असेही ओबीसी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलु कटरे यांनी व्यक्त केले आहे.
०००००





