31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता घरफोडी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद

घरफोडी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद

0
143

चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील पांजरा येथील सुरेंद्र गुलाब पटले यांच्या घरी २९ जुलै रोजी दिवसाढवळ्या चोरी झाली होती. चोरट्यांनी ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या घटनेचा काही तासांत छडा लावत तिरोडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

सुरेंद्र पटले (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ जुलै रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातून अंदाजे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स (किंमत २० हजार रुपये), पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत २५ हजार रुपये) १ ग्रॅमची नथ व खडे (किंमत १० हजार रुपये) आणि रोख १५०० रुपये असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. दरम्यान, या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय कवडे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आला. आरोपींचा माग काढण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

अशी आहेत आरोपींची नावे

आनंदा चंद्रभान पवार (वय ५५, रा. पेनसांगवी, ता. चिखली, जि. बुलडाणा), नितीन अनिल शिंदे (वय २४, रा. आलापूर, ता. माजलगाव, जि. बीड) व बच्चू हासप्राण शिंदे (वय ४, रा. लोणी, ता. चिखली, जि. बुलडाणा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.या तपास कार्यात पोलीस कर्मचारी दीपक खांडेकर, संजू बांते, विशाल मरकाम, खराबे, महेंद्र अंबादे, अमित गायकवाड, शैलेश पटले, प्रणव तिवारी, अख्तर शेख, संदीप कोरे यांनी सहभाग घेतला.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने भंडारा, रामटेक व तुमसर मार्गावर शोधमोहीम राबवून खापा गावाजवळील रस्त्यावर तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवज व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.