- जागतिक क्रीडा दिन उत्साहात साजरा
- प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार
गोंदिया, दि.29 : मानवाच्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. खेळाने परिस्थितीशी प्रत्यक्ष सामना करण्याचे मानसिक सामर्थ्य व कौशल्य प्राप्त होते, जे आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगामध्ये कामी येते. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नावलौकीक करावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विशाले डोंगरे यांनी केले.
राज्य शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे आज (ता.29) जागतिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले, क्रीडा अधिकारी अभय महल्ले, सहायक माहिती अधिकारी कैलाश गजभिये, प्राध्यापक पी.बी.रहांगडाले, भारतीय क्रीडा मंडळ गोंदिया सचिव अनिल सहारे, तालुका क्रीडा संयोजक विकास कापसे, प्रशिक्षक (कराटे) विशाल ठाकुर, जिल्हा संघटक (स्काऊट) पराग खुजे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
विशाल डोंगरे पुढे म्हणाले, ऑलिम्पिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षकांनी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात यावे. विविध खेळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला-गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याची संधी या निमित्ताने खेळाडूंना मिळत असते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी सांगितले की, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, जोपासना आणि प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत तसेच नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन खेळाडूंसाठी व क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सुविधा व क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्याचा मानस आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी व प्राविण्यप्राप्त 15 खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी क्रीडा स्पर्धा मार्गदर्शिका सन 2025-26 चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.प्रारंभी आज (ता.29) सकाळी 8 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, मरारटोली, गोंदिया येथून क्रीडा रॅली निघाली व या रॅलीचे जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे समापन करण्यात आले. या रॅलीमध्ये जवळपास 400 खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक, क्रीडाप्रेमी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमास कृष्णा बाहेकर, अमित मेश्राम, दुलिचंद मेश्राम, अंकुश गजभिये, विनेश फुंडे, माधुरी परमार, दिपक सिक्का, स्नेहदिप कोकाटे, अतुल बिसेन, पंकज बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र वाळके, रितेश पाखमोडे, शिवचरण चौधरी, किसन गावड, नरेंद्र कोचे, मोहन चौरसीया यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक शिक्षक प्रदिप ढवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी अभय महल्ले यांनी मानले. कार्यक्रमास खेळाडू, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





