अर्जुनी मोरगाव-स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात नोबेल शांतता पुरस्कार विजेते दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त एक विशेष प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात दलाई लामा यांच्या अद्वितीय कार्याची, त्यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाची आणि जगभर पसरलेल्या शांततेच्या संदेशाची माहिती विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना देण्यात आली. या प्रसंगी गोठणगाव येथील तिबेटीयन केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री. कर्मा मंगा, संगीत शिक्षक श्री. ताशी, शिक्षिका जांबेल तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मा मंगा सरांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करून, दलाई लामा यांच्या जीवनातून मिळणारे प्रेरणादायी संदेश सांगितले.
यानंतर डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी दलाई लामा यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वपूर्ण प्रसंग अधोरेखित केले. त्यांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी त्यांच्या कष्टप्रेम, करुणा आणि अहिंसेच्या विचारांना स्वतःच्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ शरद मेश्राम, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ आशिष कावळे, प्रा. अंकित नाकाडे, डॉ भारत राठोड, डॉ प्रदीप भानसे इ सोबतच स्वयंसेवक उपस्थित होते.
सांस्कृतिक सादरीकरणांतर्गत जांबेल मॅडम यांच्या चमूने एक आकर्षक नृत्यप्रदर्शन सादर केले, ज्यात तिबेटीय संस्कृतीचे दर्शन घडले. या सादरीकरणाला विद्यार्थ्यांकडून आणि प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मीकांत कापगते यांनी केले. शेवटी संगीत शिक्षक ताशी यांनी मनःपूर्वक आभारप्रदर्शन केले आणि उपस्थितांना अशा उपक्रमांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.





