
गोंदिया : गणरायाची स्थापना करून फक्त उत्सव साजरा करायचे एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता आपल्याला समाजाचेही काही देणे लागते याचे भान ठेवत सामाजिकतेची जाणीव जपणारा ‘अपना गणेश उत्सव मंडळ’ यंदा २१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. उत्सवातून विविध समाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोखा जपणारे मंडळ म्हणून आज ‘अपना गणेश उत्सव मंडळा’ची ख्याती आहे.
उत्सवातून विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोख जपणारे मंडळ ‘अपना गणेश उत्सव मंडळा’कडून शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील हनुमान चौकातील महिला समाज भवनच्या प्रांगणात गणरायाची स्थापना केली जाते. येथील गणेशोत्सवाची चांगलीच ख्याती असून, भव्य-दिव्य अशा स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मात विन्नहर्ता, अशी उपाधी असलेल्या गणरायाचा उत्सव साजरा करून त्या माध्यमातून आपल्या धार्मिक परंपरा जोपासाव्या. तसेच, या उत्सवाच्या माध्यमातून समाजाप्रती आपली असलेली काही जबाबदारीही पार पाडता यावी, या उद्देशातून मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. हेच कारण आहे की, १० दिवसांच्या या उत्सवात मंडळाकडून कित्येक समाजोपयोगी उपक्रम व कार्य केले जातात.
रक्तदान, आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रम
यंदा मंडळाकडून १ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर, तर २ सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ४ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण, तर ५ सप्टेंबर रोजी रुद्राभिषेक केला जाणार आहे. याशिवाय, मंडप परिसरात सतत एईडी सुरू राहत असून, त्या माध्यमातून हेल्मेटचा वापर, व्यसनमुक्ती, डासजन्य आजार जनजागृती यांसह अन्य सामाजिक व आरोग्य विषयक बाबींवर जनजागृती केली जाणार आहे.
सात-आठ मित्रांनी केली होती सुरुवात
अरविंद तिवारी, पंकज रहांगडाले, दीपक मालगुजार, अमित अवस्थी, योगी खंडेलवाल, अभय अग्रवाल, वसंत ठाकूर, समीर चन्ने आदींनी सन २००५ मध्ये एकत्र येत मंडळाची स्थापना केली व तेव्हापासून गणेशोत्सवाला सुरुवात करण्यात आली. वर्षानुवर्षे या उत्सवाची भव्यता वाढत चालली असून, आज या मंडळात शेकडो तरुण सहभागी झाले आहेत.
अशी आहे मंडळाची कार्यकारिणी
अध्यक्ष अमित अवस्थी, संयोजक पंकज रहांगडाले, उपाध्यक्ष अमित अवस्थी, कोषाध्यक्ष अभय अग्रवाल, सचिव योगी खंडेलवाल व अजित टेंभरे, मार्गदर्शक दीपक मालगुजार, मनिष अग्रवाल, विवेक रहांगडाले, दुर्गाप्रसाद ठाकरे, सदस्य समिर चन्ने, नीलेश गुप्ता, राहुल दवे, मदन उपाध्याय, बंटी शर्मा, संदीप अग्रवाल, सचिन जैन, राजू जैन, मनोज बिसेन आर्दीचा समावेश आहे.
गणरायाचा उत्सव साजरा करताना, मंडळाकडून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. आपल्याला समाजाचे काही देणे लागते, ही भावना ठेवून गणेशोत्सव साजरा करीत आहोत. यंदाही उत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे.अमित अवस्थी, अध्यक्ष, श्री अपना गणेश उत्सव मंडळ





