महागाव येथे आमदार राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते भव्य मोफत आरोग्य शिबिर
अर्जुनी मोरगाव : (२५ जुलै ) लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताहांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महागाव व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध आजारांची मोफत तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी शहरात जावे लागू नये, तसेच वेळेवर आजारांचे निदान होऊन योग्य उपचार व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांनी सामान्य माणूस, शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या जनसेवेच्या विचारांना पुढे नेत जनतेच्या सेवेसाठी हा जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून, आजार वाढल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि गरजू नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजकुमार बडोले यांनी केले.पुढे बोलताना आमदार बडोले म्हणाले की, गरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनसेवा सप्ताह हा केवळ कार्यक्रमांचा उपक्रम नसून सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्याचा आणि त्याच्या सेवेसाठी पुढे येण्याचा संकल्प आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेतकरी आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
विकासाबाबत बोलताना आमदार बडोले यांनी सांगितले की, महागाव परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य तसेच इतर विकासकामांसाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जनतेच्या प्रश्नांसाठी आपण सदैव उपलब्ध असून मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.यावेळी ग्रामीण भागात येऊन नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉक्टरांचे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमदार राजकुमार बडोले यांनी आभार मानले. आरोग्य क्षेत्रातील सेवाभावामुळेच अशा शिबिरांचा खरा उद्देश साध्य होतो असे नमूद केले.
या भव्य मोफत आरोग्य शिबिरास जिल्हा परिषद सभापती पौर्णिमा ढेंगे, माजी जि.प उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, डॉ. नाजुकजी कुंभरे, नुतन सोनवाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोहाडकर, कृ.ऊ.बा.स सभापती यशवंत परशुरामकर, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लोकपाल गहाणे, डॉ. हरणे, सरपंच संघटना अध्यक्ष भोजराम लोगडे, आर. के. देशमुख, जिल्हा महामंत्री भाजप प्रशांत शहारे, अनिल देशमुख, सुशीलाताई हलमारे, डॉ. राहुल ठवरे, रेशीम नेवारे, मुरलीधर ठाकरे; सावंत तगडे, डॉ. देवेंद्र गणवीर, डॉ. मंगेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





