धाराशिव दि.३० सप्टेंबर-अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी बायफ बीआयएसएलडी महाराष्ट्र या संस्थेकडून मदत साहित्याचे वाटप करण्यात आले.तेर गावात आयोजित या उपक्रमांतर्गत २५ गरजू कुटुंबांना किराणा साहित्य,ब्लँकेट,मॅट व बेडशीट देण्यात आले.त्यामुळे आपत्तीग्रस्तांना थोडासा दिलासा मिळाला.
फक्त कुटुंबीयांचीच नाही,तर पशुपालकांचीही काळजी या उपक्रमातून घेण्यात आली.१०० पशुपालकांना त्यांच्या जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले.या मिश्रणाचा लाभ तेरसह चार गावांतील पशुपालकांनी घेतला.
यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मनोज घाटे यांनी उपस्थित पशुपालकांना खनिज मिश्रणाचे महत्त्व समजावून सांगितले व त्याचा वापर कसा करावा याची माहिती दिली.तसेच डॉ.मुकुंद तावरे यांनी पावसाळ्यात जनावरांचे संगोपन करण्याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
बायफ प्रकल्प समन्वयक अतुल मुळे यांनी नदीकाठच्या पूरग्रस्त गावांतील पशुपालकांसाठी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्यात आयोजित कार्यशाळेत डॉ.दीपक क्षीरसागर यांनी देखील मार्गदर्शन केले.
पूरामुळे हवालदिल झालेल्या कुटुंबांना व पशुपालकांना या मदतीमुळे नवा आधार मिळाला असून गावकऱ्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.





