दिल्ली -येथे कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलक संसद भवन (Parliament House) परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. दरम्यान, रेल्वे भवन परिसरात आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे.
संसद परिसरात वाढवला बंदोबस्त :
आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला. मुख्य प्रवेशद्वार बंद करून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची संसद भवनात भेट घेतली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनाही चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. पक्षाच्या वतीने आशुतोष रांका (Ashutosh Ranka) आणि सौरभ दास (Saurabh Das) हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने सकाळीच सरकारकडून चर्चेसाठी संपर्क साधण्यात आल्याचा दावा केला आहे.
यापूर्वी जंतरमंतर येथून संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना अडवताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत आधीपासूनच कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती. नवी दिल्ली परिसरात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 163 लागू करण्यात आले होते. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया (Manish Sisodia), संजय सिंह (Sanjay Singh), आझाद समाज पार्टी (Azad Samaj Party) चे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad), अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) तसेच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या पत्नी गीतांजली (Geetanjali) यांनीही सहभाग घेतला.
खासदार चंद्रशेखर आझाद यांनी युवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आपण त्यांच्या समर्थनासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. सरकार आपली भूमिका पार पाडत आहे, पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत आणि आपण युवकांच्या न्यायासाठी उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संसद मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.





