26.5 C
Gondiā
Monday, July 20, 2026
Home राष्ट्रीय देश अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार

अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार

0
37

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या 30 दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर (Delhi Protest Jantar Mantar) मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी काल रात्रीपासून जंतरमंतरवर बॅरिकेडिंग करत अभिजीत दिपके (abhijeet dipke) यांच्यासह सर्व आंदोलकांना त्याचठिकाणी अडकवून ठेवले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांचा एक वेगळा जमाव संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाने आक्रमक स्वरुप धारण केल्यामुळे सोमवारी दुपारी पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (abhijeet dipke) यांना ताब्यात घेतले आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार सुरु असताना दुसर्‍या बाजूला सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्नही केला. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांना जे.पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दोन तास वाट पाहायला लावली आणि त्यानंतर फक्त 10 मिनिटांची भेट दिली, असे कॉकरोच पार्टीकडून सांगण्यात आले. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ट्विट करुन सर्व खासदारांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. पोलीस निर्घृणपणे आंदोलन मोडीत काढत आहेत आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांना मारत आहे, असेही सौरभ दास यांनी म्हटले.

 संसद भवनाच्या परिसरात जवळपास 75000 आंदोलक जमले 

दरम्यान, प्रशांत भूषण यांच्या दाव्यानुसार संसद भवनाच्या परिसरात जवळपास 75000 आंदोलक जमले होते. या आंदोलकांमुळे संसद भवनाच्या परिसरात सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. दिल्ली पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवले आहे. या परिसरात बॅरिकेडच्या मोठ्या रांगा उभारुन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, काही आंदोलक या बॅरिकेडसवरुन चढून जाण्याचा प्रयत्न करत होते.

blank