25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Featured News आ. बडोलेंच्या ‘डिव्हाईन सरेंडर’ गाण्याचे मुंबईत प्रक्षेपण,संगीत क्षेत्रात आगमन

आ. बडोलेंच्या ‘डिव्हाईन सरेंडर’ गाण्याचे मुंबईत प्रक्षेपण,संगीत क्षेत्रात आगमन

0
117

गोंदिया,दि.२८-संगीत, जागरूकता व आध्यात्मिकतेची सांगड घालणारे माजी मंत्री तथा आ. राजकुमार बडोले यांनी लिहिलेल्या ‘डिव्हाईन सरेंडर-द बुद्धिस्ट अॅन्थम ऑफ पिस, अवेकनिंग अॅण्ड कम्पॅशन’ हे गीत मुंबई येथील चर्चगेटमधील डाऊनटाऊन २० सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रक्षेपित करण्यात आले.
आ. राजकुमार बडोले यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेली शांतता, आत्मबोध आणि करुणा या मूल्यांचा संदेश अंतर्भूत आहे. या गीतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळविणारे अभिनेते गगन मलिक यांनी प्रतीकात्मक भूमिका साकारली आहे. तर सुप्रसिद्ध
संगीतकार पावा यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. या आध्यात्मिक निर्मितीमध्ये दिग्दर्शक निराज प्रभाकर यांनी आपल्या कलेची भर घातली आहे. तर अनिकेत बडोले यांनी या गीताची निर्मिती केली आहे. हे गीत थाई, व्हिएतनामी, श्रीलंकन, कंबोडियन, बांगलादेशी अशा अनेक भाषांमध्येही प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
बँकॉकमधील स्टुडिओ २८ मध्ये हे गीत रेकॉर्ड करण्यात आले. बुद्धांची शाश्वत शिकवण संगीतासारख्या वैश्विक भाषेतून
सादर करत विविध संस्कृतींना जोडणारा कलात्मक सेतू म्हणून या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. या गीताच्या प्रक्षेपण सोहळ्याला रॉयल थाई कॉन्स्युलेट मुंबईचे कॉन्सुल-जनरल डॉनाविट पूल्सवात, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, श्रीलंकेच्या कॉन्सुल जनरल शिराणी अरियारत्ने, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, कौशल्या विक्रमसिंघे, थायलंडचे उद्योजक तथा संशोधक कॅप्टन नट्टाकिट चायचलेर्ममोंग्खोन, संगीतकार व गायक पावा, अभिनेते
गगन मलिक आणि दिग्दर्शक निराज प्रभाकर उपस्थित होते.
संस्कृती आणि सर्जनशीलतेची जाण असलेले कलाकार राजकारणातही आहेत, अशा शब्दात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी कौतुक केले. डॉनाविट पूल्सवात म्हणाले, भगवान बुद्धांच्या सामायिक ज्ञानाने जोडल्या गेलेल्या थायलंड आणि भारत या दोन देशांमध्ये नाते निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचा अनुभव घेणे आनंददायी आहे.
राजकुमार बडोले म्हणाले, हे केवळ एक गीत नाही, तर जागतिक ऐक्यासाठीची एक प्रार्थना आहे. आपल्या अंतर्मनातील दैवी सत्यासमोर केलेले समर्पण आहे. हे गीत भारत व जगातील करुणेचा सेतू बनले आहे. याप्रसंगी पावा व गगन मलिक यांनीही या माध्यमातून शांतता आणि जागृतीचा संदेश पुढे नेण्याची संधी मिळाल्याचा आनंद आणि कृतज्ञता वाटत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

गगन मलिक म्हणाले, “आज जग ज्या टप्प्यातून जात आहे, त्या पार्श्वभूमीवर शांततेची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले महान विचारवंत होते. करुणा आणि समता या मूल्यांमुळेच मानवजातीला योग्य मार्ग सापडू शकतो, हे त्यांना खूप आधीच समजले होते. ‘डिव्हाइन सरेंडर’च्या माध्यमातून शांतता आणि जागृतीचा संदेश पुढे नेण्याची संधी मिळाल्याचा मला मनापासून आनंद आणि कृतज्ञता वाटते.”
या कार्यक्रमामध्ये संस्कृती, कला आणि अध्यात्माचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला. शांतता आणि जागृतीचा संदेश देणाऱ्या या गीताच्या उत्सवानिमित्त अनेक मान्यवर, भिक्खू, कलाकार आणि सृजनशील क्षेत्रातील व्यक्ती एका छताखाली एकत्र आले. हे वातावरण अत्यंत शांत व चिंतनास उद्युक्त करणारे होते.

blank