25.5 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राष्ट्रीय देश राजधानीत मराठी चित्रपटांचा नवा अध्याय;दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

राजधानीत मराठी चित्रपटांचा नवा अध्याय;दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

0
3
नवी दिल्ली, दि. 7 : मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव – 2026’ चे उद्घाटन खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते आज सायंकाळी शानदार समारंभात झाले. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन झाले.
डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित या उदघाटन सोहळ्यस खासदार तावडे यांच्यासह निवासी आयुक्त श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू आदी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खा. विनोद तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला प्रभाव अधोरेखित केला. दिल्लीसह देशभरात मराठी कला, संस्कृती आणि साहित्याबद्दल मोठा आदर असून, मराठी चित्रपट व नाट्यकृतींनी अनेक हिंदी आणि इतर भारतीय भाषांतील चित्रपटांना प्रेरणा दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘पाठलाग’, ‘कुंकू’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘नटसम्राट’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘फेकाफेकी’ यांसारख्या मराठी कलाकृतींनी भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध केले असल्याचे सांगून ते म्हणाले, अनेक गाजलेले हिंदी, कन्नड, पंजाबी आणि बंगाली चित्रपट मराठी चित्रपटांच्या कथानकांवरुन निर्माण झाले आहेत. मराठी साहित्य आणि चित्रपटांमधील सर्जनशीलता, संशोधन, अभिनयातील बारकावे आणि दिग्दर्शनाची परंपरा नव्या पिढीने समजून घेतली पाहिजे, असे सांगताना त्यांनी लता मंगेशकर, विजयाबाई मेहता आणि शांता शेळके यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्कृष्ट कलाकृती घडविण्यामागील समर्पण, शिस्त आणि सूक्ष्म निरीक्षण यामुळेच मराठी कला अजरामर ठरल्याचे त्यांनी नमूद केले. दिल्लीत सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव भविष्यात मराठी नाट्य महोत्सवापर्यंत विस्तारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ स्थापन करण्यामागची भूमिका विषद केली. त्या म्हणाल्या, मराठी चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी भाषेचा परिचय दिल्लीतील मराठी तसेच इतर भाषिक नागरिकांना करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र सदनामध्ये नियमित मराठी चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून, कार्यालयीन वेळेनंतरही नागरिकांना उत्कृष्ट मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये दादासाहेब फाळके मराठी चित्रपट रसास्वाद मंडळ सुरू होणे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी अभिमानाचा क्षण असून, महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील सांस्कृतिक सेतू अधिक मजबूत करणारी ही नवी सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या चित्रनगरीचा इतिहास, मराठी चित्रपटसृष्टीतील तिचे योगदान आणि भविष्यातील वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली.
दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात आलेला दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव हा मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांचे भारतीय चित्रपटविश्वातील योगदान उल्लेखनीय असून, दिल्लीतील मराठी बांधवांना एकत्र आणत मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचे कार्य दिल्ली मराठी प्रतिष्ठान सातत्याने करत आहे. या पुढील काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठी चित्रपटासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे विवेक गार्गे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव’ नियमितपणे आयोजित करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सदनामध्ये वर्षभर दर महिन्याला एका शनिवारी मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन आणि चित्रपट रसास्वाद उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.