गोंदिया : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव, सालेकसा या नगरपंचायतींसाठी डिसेंबरला निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी गणेशनगर येथील राणी सती मंदिराच्या सभागृहात भाजपाचे निवडणूक पर्यवेक्षक अरविंद गजभिये यांनी घेतल्या. दोन नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींकरिता उमेदवारांनी मुलाखती देण्यासाठी गर्दी केली होती.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संंघ ज्या उमेदवाराला पसंती देईल तो भाजपचा नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा उमेदवार राहणार आहे.त्यातच सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार गोंदियाचे नगराध्यक्ष पद भाजपला तर तिरोडा येथील नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढणार असल्याची चर्चा आहे.तिरोड्यात भाजप कमजोर असल्याने व तिथे राष्ट्रवादी बळकट असल्याने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
गोंदिया नगरपरिषदेकरीता ओबीसी सर्वसाधारण आरक्षण नगराध्यक्ष पदाकरीता निघाल्यानंतर भाजपतर्फे अमित बुध्दे,गजेंद्र फुंडे,कशिश जायस्वाल,जितेंद्र(बंटी)पंचबुध्दे यांनी दावेदारी केली आहे.त्यासोबतच महिलामधून डाॅ.जयंती पटले,श्रध्दा अग्रवाल यांच्या नावाची पण चर्चा सुरु आहे.मात्र गोंदियात उमेदवार ठरवितांंना पुढची विधानसभा आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेत आमदार विनोद अग्रवाल यांची भूमिका महत्वाची राहणार आहे.सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पोषक उमेदवार कोण असणार त्यातही नागपूर निवासी आमदार डाॅ.परिणय फुके यांची भूमिका सुध्दा या निवडणूकीत महत्वाची राहणार आहे.
नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उध्दवसेना व सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी पर्यवेक्षक, निवडणूक प्रमुख, निवडणूक माध्यमातून आता निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील चारही नगर परिषदा आणि नगरपंचायीतच्या एकूण ६६ जागांसाठी पर्यवेक्षक अरविंद गजभिये यांनी राणी सती सभागृहात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती देण्यासाठी चारही ठिकाणच्या इच्छुकांनी सभागृह परिसरात गर्दी केली होती. या मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांचे संघटनात्मक कार्य, त्या त्या भागावर पकड व जनसंपर्क, गेल्या निवडणुकीतील समीकरण आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. इच्छुक उमेदवारांचे स्वतंत्र रिपोर्ट कार्ड तयार केले जाणार असल्याचे अरविंद गजभिये यांनी सांगितले.
भाजपाची राज्य निवडणूक समिती घेणार निर्णय
नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यानंतर प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे स्वतंत्र रिपोर्ट कार्ड तयार केले जाणार आहे. यानंतर भाजपाचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्याकडे तो पाठविला जाणार आहे. कोठेकर हा अहवाल राज्य निवडणूक समिती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविणार आहेत. याच रिपोर्टकार्डवर भाजपाची निवडणूक समिती अंतिम निर्णय घेऊन उमेदवार निश्चित करणार असल्याची माहिती आहे.





