
गोंदिया- राज्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांची दुरावस्था वाढतच चालली आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत, महागाईने सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे, शेतकऱ्यांचा सातबारा-कोरा कोरा म्हणणाऱ्या भ्रष्टयुती सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली नाही. हे सरकार गोरगरिबांचे नसून मोठ्या उद्योगपतींचे हित जोपासणारे सरकार असल्याची टिका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.ते गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,गोरेगाव,सालेकसा व तिरोडा येथे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांकरीता आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
पटोले पुढे म्हणाले की, खोट्या आश्वासनांनी, दिखाऊ घोषणांनी आणि रिकाम्या गप्पांनी फसवणूक झालेली जनता आता बदलाच्या तयारीत आहे आणि त्या बदलाचे नेतृत्व सक्षमपणे काँग्रेस पक्षचं करू शकते. म्हणूनच सर्व नागरिकांनी विकास, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी नेतृत्वाचा मार्ग स्वीकारत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन जनतेला केले.

गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सचिन गोविंदराव शेंडे तसेच प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरातील आयोजित प्रचार सभांना उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. सालेकसा येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय फुंडे,गोरेगाव येथील तेजराम बिसेन व तिरोडा येथील उमेदवाराच्या प्रचाकरीता आयोजित(दि.२७)सभेत बोलत होते.
गोंदियातील प्रत्येक प्रभागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, युवकांसाठी रोजगारसंधी व कौशल्यविकास उपक्रम राबवणे, महिलांना लघुउद्योगांना आर्थिक चालना देणे, महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण, आरोग्यसेवा सर्वांपर्यंत सहज उपलब्ध करणे आणि नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन उभारणे हे आमचे स्पष्ट उद्दिष्ट असल्याचे म्हणाले.यावेळी माजी आमदार व जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,माजी आमदार गोपालदास अग्रवाल,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे, माजी जिल्हाध्यक्ष बाबा कटरे,माजी.जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,अशोक गुप्ता,गंगाधऱ परशुरामकर,एड.दुष्यंत किरसान,टी.बी.कटरे,यु.टी.बिसेन,स्नेहा कोल्हे,विमल कटरे,राजकुमार पटले आदी उपस्थित होते.





