गोंदिया,दि.१६- जिल्ह्यात आशियाई पाणपक्षी गणना (Asian Waterbird Census – AWC) २०२६ हा महत्त्वपूर्ण उपक्रम सेवा संस्था गोंदिया व वनविभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
आशियाई पाणपक्षी गणना हा आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी हिवाळ्यात राबविण्यात येणारा वैज्ञानिक उपक्रम असून, आशिया खंडातील विविध देशांमध्ये एकाच कालावधीत ही गणना केली जाते. पाणथळ क्षेत्रांमध्ये येणाऱ्या स्थलांतरित व स्थानिक पाणपक्ष्यांची संख्या, त्यांचे वितरण, अधिवासाची स्थिती तसेच त्यांच्या संख्येतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची ठरते. या गणनेतून मिळणारी माहिती पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय नियोजनासाठी उपयुक्त ठरते.
गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील तलाव व पाणथळ क्षेत्रांमध्ये दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रकारचेस्थलांतरित तसेच स्थानिक पाणपक्षी मोठ्या प्रमाणावर मुक्कामी येतात. याच अनुषंगाने आशियाई पाणपक्षी गणना २०२६ अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील परसवाडा, झिलमिली व छिपिया तलावांवर पक्षी गणना करण्यात आली. ही गणना सेवा संस्था अध्यक्ष सावन बहेकार यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया दिलीप कौशिक यांच्या उपस्थितीत, सेवा संस्थेचे स्वयंसेवक, पक्षी निरीक्षक, पक्षी मित्र व सारस मित्र यांच्या सहकार्याने रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी पार पाडण्यात आली.
या गणनेदरम्यान स्थलांतरित पाणपक्ष्यांमध्ये ग्रेलेग गूज, कॉमन पोचार्ड, नॉर्दर्न पिंटेल, नॉबिल डक, युरेशियन विजन, गडवाल, गार्गनी, ग्रे-हेडेड लॅपविंग, कॉमन टील, नॉर्दर्न शोव्हलर, मंगोलियन लार्क इत्यादी समाविष्ट होत्या. तसेच विविध स्थानिक पक्ष्यांच्या समावेशासह एकूण ४९ प्रजातींचे १७७२ पक्षीनोंद करण्यात आले.या उपक्रमात सेवा संस्थेचे कन्हैया उदापुरे, डीलेश कुसराम, प्रतीक लाडेकर, गौरव मटाले, निशांत कुर्वे, राकेश चुटे, प्रवीण देशमुख, तसेच धोटे बंधू सायन्स कॉलेज, गोंदिया येथील एन.एस.एस.चे विद्यार्थी व शिक्षक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.स्थलांतरित पाणपक्ष्यांची माहिती संकलित करून त्यांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम दरवर्षी देशभरात स्वयंसेवी संस्था, पक्षीमित्र व वनविभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतो, अशी माहिती सेवा संस्था अध्यक्ष सावन बहेकार यांनी दिली.





