सालेकसा,दि.१५ः- तालुक्यातील कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्रात ११ सप्टेंबर २०२६ रोजी वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे अवघ्या तीन तासांच्या अंतराने दोन सुरक्षित प्रसूती यशस्वीपणे पार पडल्या. ब्राम्हणटोला येथील सौ. खेलन दीनदयाल सुलाखे (वय २४) यांनी ३.९०० किलो वजनाच्या, तर सोनपुरी येथील सौ. अनिता प्रेमप्रकाश नागपुरे (वय २३) यांनी २.६०० किलो वजनाच्या निरोगी व गोंडस बालकांना जन्म दिला. सध्या दोन्ही माता आणि नवजात बालके पूर्णपणे सुखरूप आहेत.
वैद्यकीय चमूचे योगदान: वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा देशमुख व डॉ. रोहिणी पवार, तसेच आरोग्य सेविका (ANM) स्वाती टापरे व कुंदा अवसरे यांनी या प्रसूती पार पाडल्या. या प्रक्रियेत आशा सेविका अनिता डसरिया (ब्राम्हणटोला) व निशा खजुरीया (सोनपुरी) यांनी गरोदर मातांना वेळेत रुग्णालयात पोहोचवून मोलाची मदत केली, तर रुग्णवाहिका चालक संतोष रहांगडाले यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य यंत्रणेवरील विश्वास वाढवणाऱ्या या कामगिरीबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी संपूर्ण आरोग्य पथकाचे अभिनंदन केले आहे, तर दोन्ही कुटुंबांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.





