नवोदय विद्यालय व्यवस्थापन समिती सभा उत्साहात
विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
वाशिम, दि. 16 जानेवारी– विद्यार्थ्याने प्रथम स्वतःचे ध्येय निश्चित करावे आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवावी. केवळ अभ्यास नव्हे, तर नियोजनबद्ध तयारी महत्त्वाची असून वेळेचे योग्य व्यवस्थापन, विषयवार आणि नियमित पुनरावृत्ती यामुळेच यश साध्य होते.स्पष्ट उद्दिष्ट, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास हाच यशाचा खरा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
पी.एम.श्री. जवाहर नवोदय विद्यालयास विद्यालय व्यवस्थापन समिती आढावा बैठकीच्या अनुषंगाने सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून जिल्हाधिकारी श्री .कुंभेजकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या भेटीदरम्यान त्यांनी विद्यालयाचा परिसर, प्रशासकीय कार्यालय, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, शिक्षक कक्ष तसेच संगणक कक्षाची पाहणी करून शैक्षणिक व भौतिक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजीम शेख, उपप्राचार्य सुभाष लष्करी , नवोदय विद्यालय समितीचे सदस्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. हरण, खासदारांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. सिद्धार्थ देवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून नियमित सराव करावा, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला त्यांनी दिला. ‘यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी सातत्य, शिस्त आणि योग्य नियोजन आवश्यक असते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी वृत्तपत्र वाचनाचे महत्त्वही अधोरेखित करत ‘रीडर्स आर लीडर्स’ या सुप्रसिद्ध उक्तीप्रमाणे वाचन हीच व्यक्तिमत्त्व विकासाची खरी गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वाचनाची सवय अत्यंत आवश्यक असून, पुस्तकांशी मैत्री केल्यास आयुष्याला योग्य दिशा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
चालू घडामोडी, समाज, देश व जगातील बदलांची माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्र वाचन उपयुक्त असून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ही सवय अत्यंत लाभदायक ठरते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यानुसार अभ्यासाची आखणी करावी, पूर्वतयारी ठेवावी आणि आवश्यक माहितीचे संकलन करून सातत्याने अभ्यास करावा, असे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले. पुढे बोलतांना त्यांनी ,स्वतःच्या जीवनातील संघर्ष, अभ्यासातील शिस्त आणि मिळवलेल्या अनुभवांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जीवशास्त्र विभागाचे प्रा.मिलिंद खेरडे, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. रविंद्र भावसार यांचा सत्कार जिल्हाधिकारी श्री कुंभेजकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.वेळोवेळी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या नवोदय विद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. बालाजी हरण यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात यांनी केले.सचिन खरात यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांची ही भेट आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ते केवळ प्रशासक नाहीत, तर जिल्ह्याचे ‘रिअल हिरो’ आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीतून आम्हाला प्रेरणा मिळते आणि अधिक जबाबदारीने काम करण्याची ऊर्जा मिळते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन अभ्यासाबाबत अधिक सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना विद्यालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आली.विद्यालयातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पाहणी करून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व पोषक वातावरण मिळावे यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आनंद घेतला. यावेळी विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.





