आमगाव,दि.१८-पशुपालन हा केवळ पूरक व्यवसाय न राहता योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान व शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास तो ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी स्थिर व शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरू शकतो असे उदगार जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
ते जिल्हा परिषद गोदिया व पंचायत समिती आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा आसोली / आमगाव येथे आयोजित तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाची अध्यक्षता जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, जि.प. चे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, पशु व कृषी विभागाच्या सभापती दिपा चंद्रिकापुरे, अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, पंचायत समितीच्या सभापती योगिता पुंड, जि.प. सदस्य उषा मेन्ढे, हनवंत वट्टी, छबुलाई उके, प. स. उपसभापती सुनंदा उके, पस सदस्य नोहरलाल चौधरी, शिलाताई ब्राम्हणकर, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी पशुपालक उपस्थित होते.
जि.प. अध्यक्ष भेंडारकर यांनी पशुपालकांना उद्देशून पुढे म्हणाले कि सध्याच्या काळात शेतीबरोबरच पशुपालनावर भर देणे अत्यंत आवश्यक असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य मजबूत होऊ शकते, पशुधनाची काळजी, वेळेवर लसीकरण, संतुलित आहार व स्वच्छता राखल्यास दूध उत्पादनात तसेच पशुपक्ष्यांच्या वाढीमध्ये लक्षणीय सुधारणा होते असल्याचे बोलले. पशुपालकांनी आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धत आत्मसात करून आपला व्यवसाय फायदेशीर करावे, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पशुसंवर्धन योजना, अनुदान, कर्जसुविधा, विमा योजना यांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही यावेळी नमूद केले.
याप्रसंगी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जालिंदर तिटमे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विनोद कोटांगले, डॉ. कांतीलाल पटले, डॉ. अजिंक्य उरकुडे, सरीता भगत, यांच्यासह विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पशुसंवर्धन विभाग, जि.प. गोंदिया व पंचायत समिती आमगाव यांच्या संयुक्त प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन
तालुकास्तरीय प्रदर्शनींमध्ये देशी व संकरीत गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालनातील विविध जातींचे कोंबडे तसेच इतर पशुपक्षी मोठ्या संख्येने ठेवण्यात आले होते. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे प्रदर्शन करून एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण केले. कार्यक्रमादरम्यान पशुपालनाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित जाती, लसीकरण, चारा व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.





