
सडक अर्जुनी : तालुक्यातील आरोग्य विभागातर्फे सिकलसेल या आजाराप्रती जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून, प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवणी अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर बोपाबोडी आणि जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, बोपाबोडी यांच्या संयुक्त विद्यमाने गावात ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन’ अभियानांतर्गत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.
शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी हातात सिकलसेल जनजागृतीचे फलक घेऊन गांवातून पदयात्रा काढली. ‘सिकलसेल टाळा, आरोग्य जपा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
रॅलीदरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांना सिकलसेल आजाराची लक्षणे, या आजाराचा प्रसार कसा होतो आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी करणे आणि वेळीच उपचार घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी भर दिला.
या जनजागृती मोहिमेत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आरोग्य विभागाच्या या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.सिकलसेल मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अशा प्रकारच्या रॅली आणि मार्गदर्शन शिबिरे अत्यंत फलदायी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.





