अर्जुनी मोरगाव,दि.१९– महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत आज निमगाव येथे सखोल मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चन्ना बाकती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर, निमगाव यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना सिकलसेल ॲनिमिया म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि या आजारावर वेळीच उपचार घेणे का गरजेचे आहे, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून घराघरात हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने खालील सदस्यांचा डॉ. पल्लवी नाकाडे (समुदाय आरोग्य अधिकारी – CHO) यांनी सिकलसेल प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.
योगिनी सोनावणे (ANM) व दिनेश पिपरे (MPW) यांनी आरोग्य तपासणी व तांत्रिक बाबींची माहिती दिली.
पद्मा खोब्रागडे व कविता कुंभारे (आशा स्वयंसेविका) यांनी गावपातळीवर नागरिकांना एकत्रित करून जनजागृती करण्यात मोलाची भूमिका बजावली.सिकलसेल मुक्त समाजासाठी प्रत्येकाने आपली तपासणी करून घ्यावी आणि आरोग्य कार्ड प्राप्त करावे, असे आवाहन यावेळी आरोग्य पथकाद्वारे करण्यात आले. या मोहिमेमुळे निमगाव परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





