नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नवीन यांनी स्वीकारल्यानंतर आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी केवळ नवीन यांच्या नेतृत्वाचे कौतुकच केले नाही, तर “नितीन नवीन आता माझेही बॉस आहेत,” असे म्हणत पक्षसंघटनेत कार्यकर्त्याचे स्थान सर्वोच्च असल्याचे अधोरेखित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी अत्यंत विनम्रपणे स्वतःचा उल्लेख एक ‘कार्यकर्ता’ म्हणून केला. ते म्हणाले, “लोकांना वाटत असेल की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ५० व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि गेली २५ वर्षे सरकारचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. हे सर्व एका बाजूला आहे, पण माझ्या जीवनातील सर्वात मोठी आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मी ‘भाजपचा कार्यकर्ता’ आहे. नितीन नवीन आता आपल्या सर्वांचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते माझेही बॉस आहेत आणि ही शिस्त पाळणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे.”
अध्यक्ष बदलले तरी आदर्श तेच!”
“भारतीय जनता पक्षात पदभार बदलणे ही केवळ एक व्यवस्था आहे, पण कार्यभार ही आयुष्यभराची जबाबदारी असते. आमच्याकडे काळानुसार अध्यक्ष बदलतात, पण पक्षाचे मूळ आदर्श कधीही बदलत नाहीत. नेतृत्व बदलले तरी आमची ध्येयधोरणे आणि दिशा तीच राहते,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संघटनात्मक संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जनसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “जनसंघाच्या वटवृक्षातूनच भाजपचा जन्म झाला आहे. आज भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे, त्यामागे लक्षावधी कार्यकर्त्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदान आहे. त्या सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. भारताची लोकशाही किती मजबूत आहे, हे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या या प्रवासावरून दिसून येते.” भाजप केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक ‘संस्कार’ आणि ‘परिवार’ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “आमच्या पक्षात केवळ सदस्यत्व (Membership) नसते, तर आम्ही एकमेकांशी नात्याने (Relationship) जोडले गेलो आहोत. भाजप ही अशी परंपरा आहे, जिथे काम केवळ पदाने नाही तर एका निश्चित प्रक्रियेने चालते. पद मिळणे ही तात्पुरती व्यवस्था असू शकते, पण देशासाठी काम करणे ही आमच्यासाठी आजीवन जबाबदारी आहे,” असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. देशातील आणि जगातील राजकीय समीक्षकांनी भाजपच्या या लोकशाही प्रक्रियेची दखल घेतली पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया भाजपमध्ये आहे, ती इतर कोणत्याही पक्षात पाहायला मिळत नाही. नेतृत्व बदलले तरी पक्षाची राष्ट्रवादाची दिशा आणि गरिबांच्या कल्याणाचे आदर्श सदैव स्थिर राहतात, हा संदेश त्यांनी या भाषणातून दिला. नितीन नवीन यांच्या रूपाने एका तरुण नेतृत्वाकडे सूत्रे जाताना, हा बदल म्हणजे केवळ व्यक्तीचा बदल नसून पक्षाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा एक भाग आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. नव्या ऊर्जेसह जुने आदर्श घेऊन पक्ष पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





