स्पर्श कुष्ठरोग जनजागृती व कुष्ठरोग मुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अभियान प्रभावीपणे राबवावे-जिल्हाधिकारी कुंभेजकर
जिल्हा कुष्ठरोग समन्वय समितीची बैठक संपन्न
वाशिम, दि. २९ जानेवारी –‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती व कुष्ठरोग मुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अभियान २०२५-२६’च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत योग्य माहिती पोहोचवून भेदभाव समाप्त करण्याचा संकल्प करूया. या मोहिमेत सर्वांनी मिळून सक्रियपणे सहभागी व्हावे.आणि या अनुषंगाने नागरिकांनीही या मोहिमेस सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आज दि.(२९) रोजी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती व कुसुम अभियानाबाबत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कावरखे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. निरज शिंदे, , जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी स्वप्नील चव्हाण , जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मोबिन खान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.प्रतिक चाटले, आशा समन्वयक जगदीश पवार , उपस्थित होते.
‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊ या’ हे यंदाच्या कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे घोषवाक्य आहे. अभियानातंर्गत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी संबंधित यंत्रणांनी आवश्यक सहकार्य व समन्वय ठेवून काम करावे असेही प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे बोलतांना म्हणाले की, जिल्ह्यात सर्वत्र कुष्ठरोग आजार, ओळख, तपासणी व मोफत उपचार करावेत. विशेषत: कुष्ठरुग्ण शोधासाठी प्राधान्याने सर्वेक्षण करुन कुष्ठरुग्ण लक्षणांची माहिती व उपचारासंबंधी संदेश देण्यात यावेत. तसेच आढळणाऱ्या रुग्णाला उपचार उपलब्ध करुन द्यावेत. कुष्ठरोग लवकर निदान व वेळेवर उपचाराने पूर्ण बरा होतो व त्याविषयीचे गैरसमज सर्वसामान्य नागरिकांना समजेल यासाठी यंत्रणेने प्रयत्नशील राहावे.
डॉ. निरज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात स्पर्श व कुसुम अभियानांतर्गत दिनांक ३० जानेवारी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी कुष्ठरोग निवारण दिन साजरा करून, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत हे अभियान राबवण्यात येत आहे. अभियाना दरम्यान जिल्ह्यात कुष्ठरोग विषयी जनजागृती कार्यक्रम, तसेच वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण करणे व नवीन रुग्ण शोधून उपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करणे व कुष्ठरोगाचा प्रसार कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सादरीकरण याव्दारे सांगितले.
या अभियानांतर्गत गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असून, आरोग्य तपासणी शिबिरे, माहितीपर कार्यक्रम, पोस्टर-बॅनरद्वारे प्रचार, शाळा-महाविद्यालयांतून जनजागृती तसेच लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.बैठकीला आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.





