28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ महावितरणचा वीजचोरांना शॉक 9 महिन्यांत 5 कोटींची वीजचोरी उघड, 2,130 ग्राहकांना दणका

महावितरणचा वीजचोरांना शॉक 9 महिन्यांत 5 कोटींची वीजचोरी उघड, 2,130 ग्राहकांना दणका

0
45

नागपूरदि.31 जानेवारी 2026: महावितरणच्या नागपूर परिमंडलाने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली असून, एप्रिल ते डिसेंबर 2025 या नऊ महिन्याच्या कालावधीत महावितरणच्या स्थानिक तांत्रिक विभागाने केलेल्या धडक कारवाईत एकूण 1 हजार 963 ठिकाणी थेट वीजचो-या उघडकीस आणल्या आहेत. याशिवाय ज्या कारणासाठी वीज घेतली त्याव्यतिरिक्त इतर कारणासाठी अनधिकृत वापर करणाऱ्या 167 ग्राहकांवरही कार्यवाही करीत एकूण 2 हजार 130 ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले असून, प्रामाणिक ग्राहकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

कोट्यवधींचे नुकसान आणि दंडात्मक कारवाई:

या नऊ महिन्यांच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील तब्बल 11 हजार 962 ग्राहकांच्या वीज यंत्रणेकडील तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 963 ग्राहकांनी तब्बल 4 कोटी 99 लाख 58 हजार रुपयांच्या 23 लाख 82 हजार 631 युनिट्सची वीज चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी या चोरीच्या बदल्यात महावितरणने नियमानुसार देयके आणि तडजोडीपोटी 1 कोटी 3 लाखांचा दंड असा एकूण 6 कोटी 2 लाखाचे देयक संबंधित ग्राहकांना आकारला आहे. यातील 36 ग्राहकांनी तडजोड करण्यास नकार दिल्याने किंवा गंभीर स्वरूपाची चोरी केल्याने त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत विद्युत कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर करून वीजचोरीच्या अतरंगी‘ क्लुप्त्या:

या मोहिमेत वीजचोरीचे अत्यंत प्रगत आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी 974 जणांनी थेट मुख्य वीज वाहिनीवर ‘आकडा’ टाकून चोरी केली होती. मात्र, उर्वरित 989 ग्राहकांनी तांत्रिक छेडछाडीचा मार्ग अवलंबला होता. यामध्ये मीटरमध्ये रिमोट कंट्रोल बसवून ते दुरूनच बंद करणे, मीटरच्या मागील बाजूस सूक्ष्म छिद्र पाडून रोध (Resistance) निर्माण करणे, मीटर संथ करण्यासाठी अंतर्गत सर्किटमध्ये बदल करणे किंवा मीटर पूर्णपणे बंद पाडणे अशा ‘अफलातून’ क्लुप्त्यांचा समावेश आहे. याशिवाय, ज्या कारणासाठी वीज घेतली त्याव्यतिरिक्त इतर कारणासाठी अनधिकृत वापर करणाऱ्या 167 ग्राहकांवरही कारवाई करून 39.30 लाखांची देयके आकारण्यात आली आहेत.

प्रामाणिक ग्राहकांना बसणारा फटका:

वीजचोरीचा सर्वाधिक फटका हा प्रामाणिकपणे आणि नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना बसतो, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. अनधिकृत विद्युतभारामुळे रोहित्रांवर (ट्रान्सफॉर्मर) क्षमतेपेक्षा जास्त ताण पडतो. यामुळे ट्रान्सफॉर्मर जळणे, शॉर्ट सर्किट होणे आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होणे असे प्रकार घडतात. यामुळे महावितरणला आर्थिक नुकसानीसोबतच ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठीच वीजचोरी रोखणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

वरिष्ठ स्तरावरून थेट संनियंत्रण:

ही विशेष मोहीम महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, संचालक (संचलन) सचिन तालेवार, प्रादेशिक संचालक परेश भागवत आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. येणाऱ्या काळात सदोष मीटर असणारे ग्राहक, सरासरी बिल येणारे ग्राहक आणि ‘अभय योजने’चा लाभ न घेतलेले थकबाकीदार यांची कसून तपासणी केली जाणार आहे.

महावितरणचे आवाहन:

“विजेचा रितसर मीटर घेऊनच वापर करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. नागरिकांनी चोरट्या मार्गाचा अवलंब करून स्वतःला कायदेशीर संकटात टाकू नये. अखंडित आणि दर्जेदार वीजसेवेसाठी महावितरणला सहकार्य करावे,” असे आवाहन महावितरणने केले आहे.

blank