24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ ‘काया वाचा मने’ ही अंतर्मनातील संघर्षांचे व सामाजिक वास्तवाचे प्रामाणिक भाष्य –...

‘काया वाचा मने’ ही अंतर्मनातील संघर्षांचे व सामाजिक वास्तवाचे प्रामाणिक भाष्य – प्रा. डॉ. माधव पुटवाड

0
18

-मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त अमरावती विद्यापीठात चर्चासत्र

अमरावती-साहित्य हे केवळ कथानक मांडण्याचे साधन नसून, माणसाच्या काया, वाचा आणि मन या त्रिसूत्रीचे सखोल आत्मपरीक्षण करणारे माध्यम आहे. ‘काया वाचा मने’ ही कादंबरी माणसाच्या देहबद्ध अस्तित्वापासून मानसिक आंदोलनापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे उलगडते. त्यामुळे ही कादंबरी केवळ वाचकांपुरती मर्यादित न राहता विचारप्रवृत्त करते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. माधव पुटवाड यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग व विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा–२०२६ निमित्त आयोजित ‘काया वाचा मने’ या कादंबरीवरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रा. डॉ. पुटवाड यांनी कादंबरीच्या आशयविश्वाचा सखोल वेध घेताना सांगितले की, व्यक्ती आणि समाज यांच्यातील संघर्ष, नैतिक द्वंद्व, मूल्यांची घसरण आणि अंतर्मनातील अस्वस्थता यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आढळते. कोणताही विचार किंवा साहित्यप्रवाह अंतिम नसतो. अंतिम सत्याचा दावा करणारा विचार मुळातच अस्थिर असतो आणि म्हणून तो प्रश्नांकित होण्याच्या भीतीने दैववादी चौकटीत अडकतो. अशा दैववादी दृष्टिकोनाला छेद देण्याचे धाडस लेखकाने या कादंबरीत केले असून, त्यामुळेच ‘काया वाचा मने’ वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
चर्चासत्राचे प्रमुख अतिथी व कादंबरीकार सुनील यावलीकर यांनी कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेविषयी भूमिका मांडली. समाजातील विसंगती, माणसाच्या मनातील ताणतणाव आणि नैतिक संघर्षांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न या कादंबरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “साहित्य हे प्रश्न विचारण्यासाठी असते, उत्तरे देण्यासाठी नव्हे. वाचकाला अस्वस्थ करणारे साहित्यच दीर्घकाळ टिकते,” असेही त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चासत्रांचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. मराठी साहित्याचा अभ्यास केवळ अभ्यासक्रमापुरता न राहता समाजाशी जोडलेला असावा, असे त्यांनी सांगितले. संशोधक व विद्यार्थ्यांनी साहित्याकडे भावनिकतेपलीकडे जाऊन चिकित्सक दृष्टीने पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्ध समीक्षक दा. गो. काळे यांनी ‘काया वाचा मने’ या कादंबरीचे मराठी कादंबरी परंपरेतील स्थान विशद केले. समाजबदलाच्या प्रेरणेतून कार्यरत असलेला संवेदनशील नायक, व्यवस्थेशी झुंज देताना स्वतःच्याच आत निर्माण होणारा संघर्ष आणि शिक्षक म्हणून त्याची सजग भूमिका यांचा हा अनुभवदस्तऐवज असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. प्रणव कोलते यांनी कादंबरीच्या भाषाशैली, निवेदनतंत्र व आशयरचनेचे विश्लेषण केले. संवादप्रधान, सहज पण अंतर्मुख करणारी भाषा आणि वास्तववादी कथनासोबत साधलेला मानसिक विश्लेषणाचा समतोल ही या कादंबरीची महत्त्वाची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भगवान फाळके यांनी कादंबरीची परखड व चिकित्सक समीक्षा मांडली. नायक दिनकरने चळवळ का सोडली, याचे स्पष्टीकरण देणारी ही कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य वाचकांमध्ये सामाजिक चळवळींबाबत निराशा निर्माण होण्याची शक्यता या कादंबरीत असून, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मात्र व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील संतुलन साधण्याचा मार्ग ती सूचित करते, असे मत त्यांनी मांडले. कादंबरीतील नायकाचे चिंतन अनेक ठिकाणी अत्यंत सामान्य स्वरूपाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चर्चासत्राचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. अभिजित इंगळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. सारिका वनवे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षण व साहित्य क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदव्युत्तर मराठी विभागातील उमाशंकर ठाकूर, अंशदायी शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित हे चर्चासत्र मराठी साहित्याच्या अभ्यासाला आणि सामाजिक भानाला नवी दिशा देणारे ठरल्याची भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.

blank