43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ अमरावतीत तिसरे अ. भा. ‘एल्गार’ मराठी गज़ल संमेलन ७, ८ ला

अमरावतीत तिसरे अ. भा. ‘एल्गार’ मराठी गज़ल संमेलन ७, ८ ला

0
24

■ संमेलनाध्यक्षपदी वैभव जोशी
■ मुशायरे, परिसंवाद आणि गज़ल मैफिलींचा आस्वाद घेण्याचे चाहत्यांना आवाहन

अमरावती (प्रतिनिधी) : ‘विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’, असा दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारे गज़लसम्राट सुरेश भट यांच्या जन्मभूमी अमरावतीत मराठी गज़लचा महायज्ञ रंगणार आहे. निमित्त आहे; येत्या शनिवारी दि. ७ आणि रविवारी दि. ८ फेब्रुवारी रोजी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गज़ल संमेलनाचे! देशभरातून २०० च्या वर गज़लकार, गायक आणि चाहत्यांच्या या आयोजनातील सहभागाने अमरावती नगरी ४८ तास गज़लमय होणार आहे.
नव्या- जुन्या निवडक गज़लकारांचे तब्बल १४ मुशायरे, परिसंवाद, गज़ल गायकीचा आनंद, मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धाटन आणि समारोप आणि समारोपाला गज़लगायक दत्तप्रसाद रानडे यांची सोबतीचा करार’ ही सुश्राव्य मैफिल, अशी श्रवणीय मेजवानी अमरावतीकरांना अनुभवायला मिळणार आहे. स्व. सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान आणि स्व. वसंतराव पालेकर स्मृती प्रतिष्ठान, अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध सिनेगीतकार आणि गज़लकार वैभव जोशी भूषविणार आहेत. संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी ९.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. उद्घाटन ज्येष्ठ गज़ल अभ्यासक डॉ. राम पंडित यांच्या हस्ते होणार असून मंचावर मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे, स्वागताध्यक्ष नाना लोडम यांच्यासह विशेष अतिथी म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव ‘पद्मश्री’ प्रभाकरराव वैद्य, दिलीप जोशी, डॉ. गणेश गायकवाड, दत्ता बाळसराफ, ओमप्रकाश चर्जन, शीतलताई पालेकर, श्यामला जोशी, शाहीर सुरेशकुमार वैराळकर, दगडू लोमटे आणि ओबेद आजम आज़मी उपस्थित राहतील. उद्घाटन सोहळ्यात काही पुस्तकांचे प्रकाशन होणार असून काही पुरस्कार देखील मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत. सूत्रसंचालन नितीन भट करतील तर आभार संदीप देशमुख मानतील.
उद्घाटक सोहळ्यानंतर संमेलनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत शायर इलाही जमादार, प्रकाश मोरे, कमलाकर देसले, मधुसूदन नानिवडेकर, सतीश दराडे, अनिल कांबळे आणि लक्ष्मण जेवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ७ मराठी गज़ल मुशायरे होणार आहेत. याच दिवशी रात्री ८ वाजता गायक आणि संगीतकार सुरेश दंडे, ‘गज़लरत्न’ डॉ. राजेश उमाळे आणि राहुलदेव कदम यांची गज़ल मैफिल रंगणार असून पहिल्या दिवसाचा समारोप स्व. बशर नवाज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित हिंदी- उर्दू मुशायऱ्याने होईल. जनाब हफिज मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मुशायऱ्यात ओबेद आजम आजमी, डॉ. दिलीप पांढरपट्टे ‘रिंद’, डॉ. गणेश गायकवाड ‘आगाज’, अनंत नांदूरकर ‘खलिश’, नीलम साळुंखे, सुधीर बल्लेवार ‘मलंग’, एजाज शेख आणि दीपक मोहाळे सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन हारून उस्मानी करतील. यावेळी अनंत नांदूरकर ‘खलिश’ यांच्या “खलिश बाकी रहे थोडी” आणि सुधीर बल्लेवार ‘मलंग’ यांच्या “आईनासाजी” या हिंदी गज़लसंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. गज़ल संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून यात दिवंगत शायर विजय आव्हाड, नाना बेरगुडे, सुप्रिया जाधव, गिरीश खारकर, ललित सोनवणे, गौरवकुमार आठवले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ७ मराठी गज़ल मुशायरे होणार आहेत. दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी “मराठी गज़लचे वर्तमान आणि भविष्य” या विषयावर परिसंवाद होणार आहे. शिवाजी जवरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात वक्ते म्हणून संगीतकार आशिष मुजुमदार आणि गज़ल अभ्यासक दत्ता बाळसराफ सहभागी होतील. सूत्रसंचालन जनार्दन म्हात्रे करणार असून आभार नीलेश कवडे मानतील. सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी आबेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली तरन्नुम मुशायरा होणार असून यात नितीन देशमुख, आनंद पेंढारकर, दिवाकर जोशी, भैरवी चितळे, प्रमोद राठोड, राम रोगे, अविनाश काठवडे, अलका तालनकर आणि कालिदास चवडेकर सहभागी होतील. सूत्रसंचालन शरद धनगर करतील. रात्री ८ वाजता गज़ल संमेलनाचा समारोप सोहळा मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. मंचावर संमेलन अध्यक्ष वैभव जोशी, विषेश अतिथी शीतलताई पालेकर, स्वागताध्यक्ष नाना लोडम उपस्थित राहतील. समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन अजीजखान पठान करतील. समारोप सोहळ्यानंतर लोकप्रिय गज़लगायक दत्तप्रसाद रानडे यांची ‘सोबतीचा करार’ ही सुश्राव्य गज़लगायन मैफल होणार आहे. यात वैभव जोशी यांच्या आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेल्या गज़ल सादर करण्यात येतील. सूत्रसंचालन नीलिमा लोडम करतील. अमरावतीच्या गज़ल चाहत्यांनी दोन दिवसांच्या या सोहळ्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण

तिसऱ्या एल्गार मराठी ग़ज़ल संमेलनात संमेलनाची स्मरणिकेसह ‘विदर्भाची मराठी ग़ज़ल’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून अजीजखान पठाण यांच्या ‘दोन ओळींच्या मधे’, राधिका फराटे यांच्या ‘मी अस्सल प्रत जन्माची’ची दुसरी आवृत्ती, विशाल राजगुरू यांच्या ‘झगमगत्या रात्री’, अविनाश येलकर यांच्या ‘हो तर हो नाही तर नाही’, विजय आव्हाड यांच्या गज़लांचा ‘समग्र विजय आव्हाड’, जयदीप विघ्ने यांच्या ‘रुईची फुले’ची दुसरी आवृत्ती आणि एजाज शेख याच्या ‘स्वच्छ हृदयाचे झरे’च्या दुसऱ्या आवृत्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही मानाच्या गज़ल पुरस्कारांचे वितरणदेखील या संमेलनात होणार आहे.
यात साधना सेवाभावी संस्था अंबाजोगाईतर्फे दिला जाणारा ‘गज़लसाधना जीवनगौरव पुरस्कार’ प्रशांत वैद्य (कल्याण) यांना प्रदान केला जाणार असून शरद पाटील आणि हेमलता पाटील यांच्याद्वारे दिला जाणारा स्व. सोमजी गोविंद पाटील स्मृती गजलांकुर पुरस्कार कुणाल शिरोडे (नाशिक) यांना तर स्व. आप्पासाहेब डी. जी. पाटील स्मृती गज़लांकुर पुरस्कार श्वेता बरकडे (पुणे) यांना दिला जाणार आहे तर मंगेश आणि क्षिप्रा देशमुख (पुणे) या दाम्पत्याकडून दिला जाणारा ‘स्व. व्यंकटराव देशमुख स्मृती पुरस्कार’ गजानन वाघमारे यांना प्रदान केला जाणार आहे.

blank