भंडारा,दि.06 :- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेत शासकीय आय टी आय भंडारा च्या प्रशिक्षणार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी ४ सुवर्ण आणि १ रौप्य अशी एकूण ५ पदके पटकावून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात कोणत्याही एका संस्थेने सर्वाधिक पदके मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे.
या यशाची मुहूर्तमेढ गेल्या महिन्यात नागपूर येथे झालेल्या विभाग स्तर स्पर्धेत रोवली गेली होती. नागपूर क्लस्टरमधून या संस्थेच्या अठरा गुणवंत प्रशिक्षणार्थी राज्यस्तरासाठी निवड झाली होती. हे सर्व प्रशिक्षणार्थी १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत डॉन बॉस्को लर्निंग सेंटर, कुर्ला (मुंबई) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. या अटीतटीच्या स्पर्धेत आपल्या कौशल्याने परीक्षकांची मने जिंकत आपल्या कौशल्याच्या जोरावर सुवर्ण पदक विशाखा पागोटे ट्रेड टर्नर, निशांत नागपुरे ट्रेड टर्नर,
अमित बिल्लोरे ट्रेड मेकॅनिक मोटार व्हेईकलस, रितेश बालपांडे ट्रेड रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग टेक्निशिअन तर रौप्य पदक भूषण काठगाये ट्रेड मेकॅनिक मोटार व्हेईकल यांनी पदकांची कमाई केली.या अभिमानाचा क्षणावेळी, प्राचार्य व्ही. एम.लाकडे व गटनिदेशक एम.एस.बदुकले एस.डब्ल्यू शेंडे, भाडांरपाल मोहाळे यांनी आनंद व्यक्त करुन विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांचे व निदेशकांचे कौतुक केले आहे.
यशाबद्दल सांगताना ट्रेड निदेशक तथा मार्गदर्शक प्रतिक सतदेवे, दिपक लंजे आणि रवी कावळे यांनी नागपूर क्लस्टरपासून जी सातत्यता दाखवली त्याचे पदक स्वरूपात आज ५ पदकांच्या रूपाने प्राप्त झाले आहे. अठरा प्रशिक्षणार्थी राज्यस्तरापर्यंत पोहोचणे हीच आमची पहिली मोठी यशोगाथा होती पण आता ४ सुवर्ण पदकांसह आम्ही महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाची संस्था ठरलो आहोत याचा आम्हाला अभिमान आहे हे सर्व प्रशिक्षणार्थी आता ‘इंडिया स्किल्स’ (IndiaSkills) राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज आहेत.भंडारा सारख्या छोट्याशा जिल्ह्यातून आलेल्या या प्रशिक्षणार्थ्यांनी मुंबईत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव महाराष्ट्र राज्यात लौकिक केले आहे.





