25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ ग्रंथालय संस्थांना नियमांची सखोल माहिती असणे गरजेचे :दिशा पजई

ग्रंथालय संस्थांना नियमांची सखोल माहिती असणे गरजेचे :दिशा पजई

0
160

गोंदिया, दि.6 : ग्रंथालय संस्थांच्या संचालकांनी स्वतः तयार केलेले नियम समजून घेतले पाहिजेत. संस्थांनी वेळोवेळी चेंज रिपोर्ट सादर करून वाचनालये अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात सुरू असलेली लहान वाचनालये ही ज्ञानवृद्धीसाठी सकारात्मक पाऊल असून धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून संस्थांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुनानक ऑडिटोरियम हॉल येथे आयोजित दोन दिवसीय ‘गोंदिया ग्रंथोत्सव’ अंतर्गत परिसंवादात अध्यक्षस्थानावरून त्या मार्गदर्शन करत होत्या. वाचन ही स्वतःची आवड असल्याचे सांगत त्यांनी ग्रंथालयांच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संस्थांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी डॉ.कोटेवार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. विकास साठे, लेखापरीक्षक इरफान काझी, मनोज भांडारकर तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी मीनाक्षी कांबळे उपस्थित होते.अॅड. साठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संविधानाने शासनाला जबाबदारी दिली असली तरी केंद्र व राज्य शासनाच्या कार्याला मर्यादा आहेत. प्रत्येक स्तरावर देखरेख शक्य नसल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. विश्वसनीय संस्थांचे नियंत्रण व मार्गदर्शन धर्मदाय कार्यालयामार्फत केले जाते. संस्थांनी उपनियम व धर्मदाय कायद्याचे पालन करणे अत्यावश्यक असून संस्थांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित संचालकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शंकानिरसन केले.लेखापरीक्षक इरफान काझी व मनोज भांडारकर यांनीही संस्थांच्या लेखा व प्रशासकीय बाबींविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव भगत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संतोष डोये यांनी मानले.

blank