26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ महिलांचे सक्षमीकरण म्हणजेच सक्षम भारताची पायाभरणी–लायकराम भेंडारकर

महिलांचे सक्षमीकरण म्हणजेच सक्षम भारताची पायाभरणी–लायकराम भेंडारकर

0
58

तालुकास्तरीय महिला मेळावा उत्साहात 

अर्जुनी मोरगाव –  आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. शिक्षण, आरोग्य, प्रशासन, उद्योग, शेती, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच सामाजिक कार्य अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली गुणवत्ता, क्षमता आणि नेतृत्व सिद्ध केले आहे. महिलांचा सहभागाशिवाय देशाची सर्वांगीण प्रगती शक्य नाही असे मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले.

महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहात आयोजित तालुकास्तरीय महिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पटले बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले. त्यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेले उपक्रम तसेच या महिला मेळाव्याचा उद्देश उपस्थितांसमोर मांडला.
भेंडारकर पुढे म्हणाले की, महिलांचे सक्षमीकरण हे केवळ सामाजिक जबाबदारी नसून सक्षम राष्ट्र उभारणीसाठी अत्यावश्यक आहे. महिलांनी शिक्षण, कौशल्य विकास व आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा तसेच कुटुंबाचा आर्थिक व सामाजिक विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन उद्योजकतेकडे वळावे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले. महिला सक्षम झाल्यास पुढील पिढी सशक्त घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच नवजात बालकांसाठी बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले. महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध होममेड खाद्यपदार्थांची प्रदर्शनी यावेळी लावण्यात आली होती. या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला पोर्णिमा ढेंगे सभापती महिला व बालकल्याण, आम्रपाली डोंगरवार सभापती अर्जुनी, संदिप कापगते उपसभापती , उषा मेन्ढे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य, जयश्री देशमुख जिल्हा परिषद सदस्य, कविता कापगते जिल्हा परिषद सदस्य, विमल कटरे जिल्हा परिषद सदस्य, चंद्रकला डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य, कल्पना वालोदे जिल्हा परिषद सदस्य, विना कटरे पंचायत समिती सभापती, ज्योती कांबळे उपविभागीय अधिकारी, किर्ती कुमार कटरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पल्लवी वाडेकर गट विकास अधिकारी, डॉ. तेजस कापगते, होमराज पुस्तोडे पं. स. सदस्य, शालिनी डोंगरवार पं. स. सदस्य, भाग्यश्री सयाम पं. स. सदस्य, पुष्पलत्ता दृगकर पं. स. सदस्य, कुंदा लोगडे पं. स. सदस्य, नूतन सोनवाणे पं. स. सदस्य, प्रमोद लांडगे पं. स. सदस्य, घनश्याम धामट पं. स. सदस्य, रविंद्र टेंभुर्णे बालसंरक्षण अधिकारी, डॉ. काजल शहारे वैद्यकीय अधिकारी, अनिल पटले बालविकास प्रकल्प अधिकारी, राहुल निखारे विस्तार अधिकारी, रेखा फुंडे पर्यवेक्षिका, ज्योती पटले पर्यवेक्षिका, वर्षा पुस्तोडे पर्यवेक्षिका, खाती कोटेवार पर्यवेक्षिका, जोत्सना वालदे पर्यवेक्षिका, वैष्णवी मडावी पर्यवेक्षिका, दिपा नैताने पर्यवेक्षिका, ज्योती नानेट, यशवंत बडोले, गोबाडेजी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नमिता लोथे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पुस्तोडे यांनी मानले. तसेच या महिला मेळाव्यास विविध क्षेत्रातील महिला, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

blank