
गोंदिया,दि.२७ः जिल्ह्यातील सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातंर्गत येत असलेल्या महसुल व वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन शेती करीत असलेल्या बिंझली येथील अतिक्रमीत ४५ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण दि.२६ व २७ फेबुवारी रोजी वनविभाग,महसुल व सामुहिक वनहक्क समितीच्यावतीने सयुंक्तरित्या बुलडोझर कारवाई करीत काढण्यात आले.
बिंझली गावालगत वन व महसुल विभागाची जागा असून सर्वे क्रमांक 690, 821/1, 821/2, 787, 472, 274, 93, 134 793/1, 793,740, 722 एकुन क्षेत्र 45.922 है आर शासकीय जमीनीवर काही लोकांनी अतिक्रमण करुन शेती करण्यास सुरवात केली होती.त्यामुळे बिंझली गाव परिसरात शासकीय वन जमिन शिल्लक राहिली नव्हती.याचा त्रास गावातील नागरिकांना व्हायचा.त्यातच गावालगतच्या वनजमिनिचा वनहक्क पट्टा गावाला मिळालेला होता.मात्र वनहक्क पट्टयातील जागेवर अतिक्रमणधारकांचा कब्जा असल्याने वनहक्क समितीने सदर जागेवरील अतिक्रण काढण्याचा निर्णय घेत सदर जमिन गाव विकासाच्या कामाकरिता अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेत वन व महसूल विभागास अतिक्रमण काढण्याचे पत्र देण्यात आले होते.ग्रामपंचायत बिंझलीच्यावतीने देण्यात आलेल्या पत्राची दखल घेत वनविभाग व महसुल विभागाने संयुक्त रित्या अतिक्रमणावर बुलडोजर चालवून अतिक्रमण जमिन मुक्त केले.वनविभाग व महसुल विभागाच्यावतीने अतिक्रमण काढण्याची आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई ठरली असून दोन्ही विभागाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग,सहा.वनसरंक्षक सचिन डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्रअधिकारी रमेश घुटके,तहसिलदार एन.एस.कोंडगुर्ले, क्षेत्र सहायक बी.ए.कोहरे,जे.डी.खान,ओ.एस.बनोटे,ओ.डी.तुरकर,प्रियंका पटले, वनरक्षक गणेश पाऊलझगडे,बिटरक्षक सालेकसा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक,वनमजुर.कर्मचारी,पोलीस कर्मचारी,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच विक्रांत सुभाष मिश्रा,सदस्य व वनहक्क समिती अध्यक्ष हरिचंद्र वट्टी तसेच सर्व सदस्यांसह गावातील नागरिकांनी सहकार्य केले.





