
-विद्यापीठात राष्ट्रीय युवक परिषदेत युवक संसद
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला युवक संसदेची मोठी परंपरा लाभली असल्याचे प्रतिपादन अधिसभा सदस्य विष्णू चांगदे यांनी केले. विद्यापीठ पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या ८० व्या वर्धापन वर्षानिमित्त ‘७५ वर्षांचे भारतीय गणतंत्र’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय युवक परिषद आणि राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत गुरुनानक भवन येथे शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय युवक संसद तसेच वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन करताना श्री. चांगदे बोलत होते.
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य विष्णू चांगदे, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. समित माहोरे, डॉ. सुनिता झाडे व डॉ. सुशांत चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यापीठात पूर्वी आयोजित केल्या जात असलेल्या विद्यार्थी युवक संसदेतून देशाला मोठे राजकीय नेतृत्व प्राप्त झाल्याची माहिती विष्णू चांगदे यांनी पुढे बोलताना दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. श्रीकांत जिचकार, सतीश चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेते या युवक संसदेच्या माध्यमातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. युवक संसद हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून टाऊन हॉल येथील कार्यक्रमाचा अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारताला लोकशाहीचा प्राचीन काळापासून प्रदीर्घ अनुभव आहे. लोकशाही संकल्पना आपली नाही असे आपण अभ्यासक्रमात वाचतो, अभ्यासक्रमातील भाग हा पाश्चात्य असू शकतो. मात्र, भारतामध्ये प्राचीन काळापासून गणराज्य संकल्पना अस्तित्वात होती आणि अधिक प्रगल्भ होती. प्रत्येक नागरिक जागरूक असला पाहिजे, अशी क्षमता निर्माण करण्याचे कार्य राज्यशास्त्र विभागाला करावयाचे असल्याचे श्री. चांगदे म्हणाले. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर करीत यातून भारताच्या दैदिप्यमान इतिहासाकडे बघावे, असे श्री चांगदे म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांनी राज्यशास्त्र विभाग हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर मध्य भारतातील सर्वात जुना विभाग असल्याचे सांगितले. विभागाचा दैदीप्यमान इतिहास तसेच ऐतिहासिक परंपरा समोर नेण्याचा संकल्प करण्याची गरज डॉ. जांभुळकर यांनी व्यक्त केली. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देत युवक संसद आणि वादविवाद स्पर्धेविषयी त्यांनी यावेळी सांगत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख डॉ. समीर माहोरे यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत युवकांचा लोकशाहीत सहभाग वाढावा या दृष्टीने विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची प्रशंसा केली. युवकांनी राष्ट्र निर्माणच्या कार्यात सहभागी झाल्यास विकसित भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असे देखील डॉ. माहोरे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार डॉ. प्रमोद काणेकर यांनी मानले. युवक संसद तसेच वादविवाद स्पर्धेत विविध भागातील स्पर्धक तसेच पथक सहभागी झाले होते.
*युवक संसदेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय युवक संसद कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवक संसद स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे व्हिडिओ मागवून त्यानंतर छाननी करीत अंतिम स्पर्धेकरिता चार संघांची निवड करण्यात आली होती. 25 विद्यार्थ्यांचा समावेश असलेला एक संघ अशा चार संघात अंतिम फेरी रंगली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ या विषयाच्या अनुषंगाने विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली. संसदेतील प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेता, विविध खात्याचे मंत्री यात प्रश्न आणि उत्तर यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवीत भारताच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक प्रश्नांची चर्चा करीत त्याचे समाधान शोधण्याचा देखील या माध्यमातून प्रयत्न केला. या सोबतच घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत एकूण १३ संघांनी सहभाग घेतला.





