-‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रामाणिक संशोधन प्रकाशनाची गुणवत्ता व नैतिकता वाढविणे’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा
नागपूर : संशोधकांनी आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे सर्वोत्तम संशोधन करावे, असे प्रतिपादन नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था आयसीएआरचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रामाणिक संशोधन प्रकाशनाची गुणवत्ता व नैतिकता वाढविणे’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.घोष मार्गदर्शन करीत होते.
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था-आयसीएआरचे संचालक डॉ. दिलीप घोष, विशेष अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. राजू हिवसे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विद्यापीठ ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगला हिरवाडे, आरडीसी सेल संचालक डॉ. दादासाहेब कोकरे, कार्यशाळा समन्वयक डॉ. शालिनी लिहितकर यांची उपस्थिती होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर करीत संशोधनाचा दर्जा सुधारुन संशोधन संस्कृती कायम ठेवत आगामी काळात संशोधन क्षेत्रात भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास येईल, असे डॉ. दिलीप घोष पुढे बोलताना म्हणाले. मागील दोन दशकांमध्ये जागतिक संशोधन क्षेत्रात कमालीचा बदल झाला आहे. संशोधनाचा दर्जा, सायटेशन, इम्पॅक्ट फॅक्टर, आंतरविद्याशाखीय संशोधनावर अधिक भर दिला जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, जर्नल्स, संशोधन प्रकाशने, संशोधन डाटाबेस, चौर्यकर्म शोध यात वाढ होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारतीय संशोधन विश्वासार्ह ठरत आहे. सामाजिक गरज, जागतिक जबाबदारी याचे भान ठेवत कृत्रिम बुद्धिमत्तेवर पूर्णतः अवलंबून न राहता सर्वोत्कृष्ट संशोधनावर भर देण्याचे आवाहन डॉ. घोष यांनी केले. स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी शिष्यांची तांदूळ आणण्यावरून घेतलेल्या परीक्षेचे उदाहरण त्यांनी दिले. या उदाहरणावरून स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे प्रामाणिकता संशोधकांनी दाखविल्यास भारतीय संशोधन संस्कृती वाढवू शकतो, असे डॉ. घोष म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन क्षेत्रात संशोधकांना डेटा, भाषा तसेच ड्राफ्ट तयार करण्यास मदत करते. एआयच्या माध्यमातून पूर्णतः संशोधन न करता मानवीय दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी डॉ. घोष यांनी केले.
*एआयने संशोधन कार्य सोपे : डॉ. राजू हिवसे*
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मुळे संशोधन कार्य सोपे झाले असल्याचे विशेष अतिथी कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी सांगितले. एक दशकापूर्वी संशोधन कार्य करताना अनेक रेफरन्स संशोधन पेपर ग्रंथालयात शोधावे लागत होते. त्यातील मोजकेच संशोधन पेपर उपयोगात येत होते. एआयमुळे रेफरन्स संशोधन पेपर शोधणे सोपे झाले असून वेळेची बचत होत असल्याचे डॉ. हिवसे यांनी सांगितले.
*संशोधनाचा समाजावर प्रभाव डॉ. नंदकिशोर करडे*
चांगल्या संशोधनाचा समाजावर प्रभाव होत असल्याचे प्रतिपादन आयक्यूएसी संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर करडे यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च शैक्षणिक क्षेत्रात ‘टीचिंग लर्निंग’ प्रक्रियेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आचार्य पदवी प्राप्त करताना संशोधन पेपर प्रसिद्ध करणे तसेच संशोधनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना यासाठी कार्य करावे लागत असल्याने देशात संशोधन प्रकाशनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, यातील किती संशोधन नोबेल पुरस्काराच्या तोडीचे आहेत, असा प्रश्न यावेळी करडे यांनी उपस्थित केला. नोबेल पुरस्काराच्या दर्जेचे संशोधन होण्याची अपेक्षा त्यांनी संशोधकांकडून व्यक्त केली.
विद्यापीठ आरडीसी सेल संचालक डॉ. दादासाहेब कोकरे यांनी मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा संशोधनात योग्य वापर करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना समन्वयक डॉ. शालिनी लिहितकर यांनी विद्यापीठाचे संशोधन क्षेत्रात असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनात विद्यापीठातील शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान असून सायटेशन देखील उच्च दर्जाचे असल्याचे डॉ. लिहितकर यांनी सांगितले. मागील काही वर्षात विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. डॉ. मंजू दुबे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन शिरीन सय्यद यांनी केले तर आभार ग्रंथालय व माहितीशस्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगला हिरवाडे यांनी मानले. कार्यशाळेत २७० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक संशोधनांनी सहभाग घेतला.
*विविध सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन*
या राष्ट्रीय कार्यशाळेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूर येथील डॉ. दिलीप सिसोदिया यांनी ‘एआय टूल्स फाॅर रिसर्च अँड पब्लिकेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद येथील चीफ लायब्ररी ऑफिसर डॉ. भोजराजू गुंजन यांनी ‘बुस्टिंग रिसर्च व्हिजिबिलिटी थ्रू प्रोफाइलिंग टूल्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे यांनी ‘रायटिंग रिसर्च पेपर इन इम्पॅक्टफुल जर्नल्स अँड इंक्रिझिंग सायटेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे यांनी ‘अव्हायडिंग प्रिडॅटरी जर्नल्स फॉर इथिकल पब्लिशिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. शालिनी लिहितकर यांनी इन्हॅनसिंग रिसर्च एफिशियन्सी थ्रू रेफरन्स मॅनेजमेंट टूल्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांनी मार्गदर्शन करताना आंतरविद्याशाखीय विषयाच्या अनुषंगाने संशोधन करण्याचे आवाहन संशोधकांना केले.





