-भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषदेचे आयोजन
नागपूर : विकसित भारतासाठी नागपूर ‘रोल मॉडेल’ ठरेल, असा सूर आयसीटीआरडी गोलमेज परिषदेच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर शिक्षण विभाग आणि भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारताच्या संकल्पनेत नागपूर शहराचे योगदान’ या विषयावर गोलमेज परिषद बुधवार, दि.१८ मार्च २०२६ रोजी पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या सभागृहात पार पडली. या चर्चासत्रात सहभागी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी विकसित भारताच्या दृष्टीने आपले महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शन करताना महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी नागपूर शहर शाश्वत विकासाच्या दिशेने महापालिका मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर शहराच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, डॉ. राजेश गादेवार, विद्यापीठ आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, आयसीटीआरडी चेअरमन डॉ. आशिष ससनकर, परिषदेचे समन्वयक डॉ. केतन मोहितकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ‘विकसित भारत@२०४७’ संकल्पना साकार करण्यात सर्व नागरिकांचे यामध्ये सहकार्य महत्वपूर्ण ठरणार असल्याचे महापौर श्रीमती नीता ठाकरे पुढे बोलताना म्हणाल्या. विकसित भारताचे ध्येय गाठायचे असेल तर अधिकाधिक कौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्मितीसह त्याच प्रमाणात स्टार्टअप निर्माण होणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने नागपूर शहराचा विकास व्हावा, नदी-नाले स्वच्छ अभियान, सोलर योजना, जलपुनर्भरण, हरित शहर योजना अशा अनेक उपक्रम नागरिकांच्या सहकार्यातून राबविल्या जाणार आहे. शहरातील तीन नद्यांना पुनर्जीवित करण्याचे कार्य महापालिका हाती घेणार आहे. शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन शाश्वत व्हावे यादृष्टीने विचार करीत जनतेने नागपूरच्या विकासात विकसित भारताच्या दिशेने सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ठाकरे यांनी केले.
*विकसित भारतीयातून विकसित भारत – डॉ. विकास महात्मे*
विकसित भारतीयातून विकसित भारत निर्माण होईल, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले. नदी, पहाड म्हणजे भारत नव्हे तर लोकांना मिळून भारत बनला आहे. प्रत्येक व्यक्तीला विकसित तयार करणे महत्त्वपूर्ण आहे. अपयशाला यशाची प्रथम पायरी मानत शिकणे महत्त्वाचे आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला कौशल्यपूरक बनवणे आवश्यक आहे. आनंदी राहणे हा जीवनाचा भाग आहे. आनंदी जीवनासाठी हॅपिनेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेकांना एकत्र आणण्याचे कार्य केले जात आहे. बुद्धिमत्ता आणि भावनेचा संगम करीत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन डॉ. विकास महात्मे यांनी केले.
*आपणातील कल्पना जगाला बदलेल : डॉ. पाराशर*
आपणातील कल्पना समाजाला तसेच जगाला बदलू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी केले. अशा प्रकारची गोलमेज परिषद नागपुरात प्रथमच आयोजित होत आहे. विकसित भारताच्या दिशेने होत असलेल्या मार्गक्रमणात नागपूर शहराचे योगदान कसे असेल या दिशेने होत असलेल्या चर्चेबाबत डॉ. पाराशर यांनी समाधान व्यक्त केले. समाधान जीवनाचा भाग असला तरी भूक देखील महत्त्वपूर्ण आहे. भूक असेल तरच समस्येतून समाधान शोधता येते, असे डॉ. पराशर म्हणाले.
परिषदेचे संयोजक डॉ. केतन मोहितकर यांनी ‘विकसित भारताच्या संकल्पनेत नागपूर शहराचे योगदान’ कसे असावे याविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. लोकांना कृतिशील पहावे याचा आयसीटीआरडी सातत्याने प्रयत्न करीत आहे. असे विविध उपक्रम संस्थेने महापालिकेच्या माध्यमातून राबविले आहे. युवकांना सक्षम बनविण्यासाठी स्टार्टअप फेस्टचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित नागपूर करीता सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन डॉ. केतन मोहितकर यांनी यावेळी केले. आयसीटीआरडी चेअरमन डॉ. आशिष ससनकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात नागपूर मध्य भारतातील महत्त्वपूर्ण ग्रोथ इंजिन बनू शकते, असे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रासह लॉजिस्टिक हब, मेडिकल हब, ट्रान्सपोर्टेशन हब, पर्यटन हब म्हणून नागपूरची ओळख होत आहे. या सोबतच भारताचे ज्ञान केंद्र म्हणून नागपूरचा उदय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शाश्वत शहर विकासाच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी दिली.
या चर्चासत्रात माजी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, जिल्हा कौशल्य सह आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज, ध्रुव डायग्नोस्टिकचे डॉ. शैलेंद्र मुंदडा विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, क्रीडा उपसंचालक डॉ. पल्लवी धात्रक, इलिव्हेट फिटनेस अँड सुरो इन्फ्राच्या संस्थापक निकिता पेडगावकर दोशी, इनफेड आयआयएम नागपूरचे सीओओ डॉ. शिवाजी धवड, ॲड. आशिष तारवाणी, सन्तेरा उद्योगाच्या संस्थापक आरुषी सना, सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेकानंद औटी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नागपूर कॅम्पस हेड श्री अनुराग वाघ, मानसशास्त्रज्ञ तानिया बागेश्वर, पायलट पाठशालाचे कॅप्टन श्रीजीत आवारी, पत्रकार निशा पंजवाणी, क्रावडेरा फाउंडेशनचे श्री क्षितिज इंगळे, डॉ. योगेश बोंडे, डिझाईन इनसाईडचे संस्थापक श्री. विपिन तळवेकर, सीए श्री. अनिकेत खापरे, श्री. सुशांत धुर्वे, श्री. संकेत काळेश्वरवार यांच्यासह अन्य तज्ञ व्यक्तींनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चासत्रात सहभागी तज्ञांनी नागपूरच्या शाश्वत विकासाबाबत आपले मत व्यक्त केले. लॉजिस्टिक, वाहतूक, ज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, सांस्कृतिक, पर्यटन क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यास विकसित नागपूर होण्याच्या दिशेने सुरुवात होईल असे मत व्यक्त केले. शैक्षणिक संस्थांनी तरुणांमधील कौशल्य विकसित करीत नागपूरला जागतिक ज्ञान केंद्र म्हणून पुढे आणावे असे देखील सांगितले. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आधुनिक तपासणी करण्यासाठी नमुने मुंबईला पाठवावे लागत होते. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूर्धर आजारांच्या तपासण्या येथे होत असून नागपूर मेडिकल हब म्हणून उदयास येत असल्याची माहिती डॉ. शैलेंद्र मुंदडा यांनी दिली. क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने नागपूरला विकसित करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्याची गरज गरज क्रीडा उपसंचालक डॉ. पल्लवी धात्रक यांनी व्यक्त केली. ऑलम्पिक का सुरू झाले त्याची संकल्पना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविल्यास नागपूर उत्कृष्ट क्रीडा हब म्हणून उदयास येईल असे डॉ. धात्रक म्हणाल्या. नागपुरात उद्योग नगरी उभी व्हावी याकरिता स्टार्टअप करीता निधी उभारण्याची गरज डॉ. शिवाजी धवड यांनी व्यक्त केली. सरकारच्या सहकार्य शिवाय खाजगी क्षेत्रावर विश्वास निर्माण होणार नाही, त्यामुळे ‘हाय रिस्क कॅपिटल’ देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. धवड म्हणाले. नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करीत शाश्वत विकासाच्या दृष्टीने नागपूर संपूर्ण देशात उत्कृष्ट उदाहरण असून आयटी क्षेत्राचा अधिक विकास होणे आवश्यक आहे. येथील तंत्रज्ञान, संस्कृती विकासाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेण्याची गरज आरुषी सना यांनी व्यक्त केली. विकसित भारताच्या दिशेने पाऊल टाकत असताना सुदृढ मानसिक आरोग्याचा देखील विचार व्हावा, असे मानसशास्त्रज्ञ तानिया बागेश्वर यांनी सांगितले. समुद्रसपाटीपासून दूर असल्याने येथील वातावरणात अधिक दृश्यमानता असल्याने पायलट प्रशिक्षण केंद्राचे हब म्हणून उदयास येईल असे कॅप्टन श्रीजीत आवारी म्हणाले. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आयुर्वेदिक औषधीयुक्त वनस्पतींची शेती शेतकऱ्यांनी करावी असे डॉ. योगेश बोंडे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ रॉय यांनी केले तर आभार संयोजक डॉ. केतन मोहितकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषदेच्या सदस्यांनी सहकार्य केले.





