गोंदिया,दि.२०– जिल्हा पोलीस दलातर्फे “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलिस स्टेशन केशोरीचे ठाणेदार मंगेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव तर्फे अतिशय दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भागातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरपायली, गंधारी व गोठणगाव अशा अतिशय दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते चौथी च्या एकूण 118 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नवेगाव बांध येथील राष्ट्रीय उद्यानात घेऊन जाण्यात आली. सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, सामाजिक- सांस्कृतिक जाणीव व्हावी व पर्यावरणाची ओळख व्हावी या उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात आले.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय उद्यान, संजय कुटी, बालोद्यान, मिरर हाऊस, हिलटॉप गार्डन, ॲडव्हेंचर पार्क इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या सुंदर स्थळांची पाहणी करुन प्रत्येक ठिकानाचा आनंद घेतला व जीज्ञासेने प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर शाळेचे शिक्षकसूरज ढाकोळे, श्री ठाकरे, श्री हजारे व श्री शेंडे यांनी सविस्तर देऊन त्यांचे मन समाधान केले तसेच त्यांना पर्यावरण, जल सिंचनसाठा, तलावाची रचना, संजय कुटीचा इतिहास व राष्ट्रीय उद्यान इत्यादी बाबत सखोल माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांनी सहलीचा व नैसर्गिक सौंदर्याचा भरपूर आस्वाद घेतला.
सदरच्या सहलीचे यशस्वी नियोजन एओपी गोठणगाव चे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते यांनी केले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहल खूप महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रोपोगंडा सेल गोंदिया चे भास्कर हरिणखेडे, जिल्हा पोलिस चे सहायक फौजदार अंबुले, मडावी तसेच हवालदार भावते, थेर, मिसार यांनी मोलाचे सहकार्य केले.




