25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ बाम्पेवाडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

बाम्पेवाडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

0
224
साकोली : तालुक्यातील बाम्पेवाडा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतालगतच्या जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. वसंत गणपत मेश्राम (५२) रा. बाम्पेवाडा असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली असून मोहफूल वेचणीच्या हंगामावर भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी वसंत मेश्राम हे नेहमीप्रमाणे गावाजवळील कम्पार्टमेंट क्र. १४३ मधील राखीव जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. मोहफूल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. वाघाने त्यांच्या नरडीचा घोट घेऊन त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विभागीय वनधिकारी अमोल नागे, भंडारा व्यवस्थापक विजय सहाय्यक पाटील, एस. यु. वनपरिक्षेत्र अधिकारी कायते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वनविभागाच्या वतीने पीडित कुटुंबाला तातडीने २० हजार रुपयांचे रोख सहाय्य आणि १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. वसंत मेश्राम यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार असून, त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.