23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ वाघाच्या शोधासाठी हत्ती दाखल

वाघाच्या शोधासाठी हत्ती दाखल

0
28

ब्रह्मपुरी,दि.27-उत्तर वनपरिक्षेत्रात वाघाने मानवासहीत अनेक पाळीव प्राण्याचे बळी घेतले होते. त्याची दहशत परिसरात कायम आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून ब्रह्मपुरी वनविभागातील मुरपार वनक्षेत्रात दोन हत्ती दाखल झाले असून त्याद्वारे ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात येणार आहे.
ब्रह्मपुरी वनविभागाच्या परीक्षेत्रात मुरपार उत्तर वनपरिसरात वाघाने गेल्या एक- दीड महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. यातच सायगाव येथील गुरनुले नामक महिला शेतात काम करीत असताना वाघाने झडप घालून त्यांना ठार केले. त्यामुळे गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी वाघाला पकडण्याची मागणी केली होती.
नागरिकांचा वाढता दबाब लक्षात घेता वनविभागाने ‘सर्च ऑपरेशन’करिता वनविभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा महिन्याभरापासून मुरपार परिसरात डेरेदाखल केला होता. परंतु वाघ वनविभागाच्या हातात लागला नाही. त्यामुळे वनविभागावर प्रचंड दबाव होता. या दबावाने सर्व प्रयोग अवलंबूनही निर्थक ठरल्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दोन हत्तीची मागणी करण्यात आली.
दरम्यान हत्तीची मागणी करूनही मिळत नसल्याने पुन्हा वनविभाग वाघाला पकडण्यासाठी अडचणीत होता. परंतु लोकांचा वाढता दबाव पाहता सोमवारी दोन हत्ती मुरपारकडे रवाना होत असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.
या हत्तीच्या माध्यमातून आता वाघाची शोध मोहिम राबविण्यात येत असल्याने वनविभागाच्या अधिर्कायांनी व कर्मचार्‍यांनी काही अंशी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. हत्तीच्या सर्च ऑपरेशनद्वारे वाघ पकडल्या जाण्यात यश येणार किंवा नाही, हे कळणारच असून ग्रामस्थांमध्ये भिती मात्र आजही कायम आहे.