आदर्श ग्रामविस्तार अधिकारी निलंबित

0
10

सालेकसा,दि.27-तालुक्यातील कारूटोला येथील ग्रामविस्तार अधिकारी एस.आर. वाघमारे यांनी ग्रामपंचायत कामकाजात घोळ, अफरातफर व नियमबाह्य काम केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी ६ ऑक्टोंबर निलंबित केले. तसेच वाघमारे यांना देवरी पंचायत समिती येथे मुख्यालय देण्यात आले.
ग्रामविस्तार अधिकारी वाघमारे यांच्या विरोधात अनेक तक्रारी पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, या तक्रारीची दखल घेवून संबंधित अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीत ते दोषी आढळले. ग्रामविकास अंतर्गत विकास कामात ग्रामपंचायतीचा विकास निधी बँॅंकेतून परस्पर काढून त्याचे रेकॉर्ड न लिहता खर्च करणे, शासकीय दस्ताऐवज सरपंचाच्या परवानगीशिाय ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर स्वत:च्या घरी ठेवणे, १४ व्या वित्त आयोगांतर्गत अंदाजपत्रकाशिवाय व निविदा न मागविता साहित्य खरेदी करणे, ग्रामपंचायत क्षेत्रात नियमबाह्यरित्या सरकारमान्य चिल्लर देशी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देणे, २0 लाख ३९ हजार ९0२ रुपये शासकीय निधीची अफरातफर करणे व पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा १९६४ च नियम ३ मधील तरतुदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तत्काळ निलबित केले. तसेच त्यांना निलंबित कालावधीकरिता देवरी येथील पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. या काळात त्यांना इतरत्र काम करता येणार नसून असे आढळल्यास कारवाई पात्र ठरतील. विशेष असे की, वाघमारे यांचा मे महिन्यात आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.