27.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home गुन्हेवार्ता पुजारीटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेत कोट्यवधींची अफरातफर

पुजारीटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेत कोट्यवधींची अफरातफर

0
211

अकरा संचालकांवर गुन्हा दाखल; नाॅयलान जाळे अनुदान वाटप प्रकरण
गोंदिया ः कोटरा येथील पुजारीटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेत लाभार्थ्यांना नाॅयलान जाळे अनुदान वाटपात एक कोटी १७ लाख ९५ हजार ७२० रुपयांची अफरातफर झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी राजेश केशवराव शहारे (वय ५२) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी मंगळवारी (ता. २४) संस्थेच्या अकरा संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोटरा येथील पुजारीटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या संचालकांनी संस्थेद्वारे नाॅयलान जाळे अनुदान वाटप लाभार्थी निवड प्रक्रियेचे पालन केले नाही. अनुदान वाटप केले किंवा कसे? याचे मूळ प्रमाणित प्रमाणके रेकार्डवर उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण अनुदानाची रक्कम संचालकांनी परस्पर उचलून अफरातफर केल्याचे दिसून येत आहे. सदर संस्थेत मासेमार मजुरीकरिता एकूण ७० लाख ६१ हजार ७७० रुपये वाटप केले, असे रेकार्डवर नमूद आहे. परंतु, मजुरी वाटप केल्याचे मूळ प्रमाणके रेकार्डवर दिसून येत नाही. एकूण वाटप रक्कम ३४ लाख २३ हजार ९५० रुपये कोणाला दिली. याबाबत पुरावे, प्रमाणके, खाते विवरण रेकार्डवर नाही. रक्कम वाटप झालेल्या व्यक्तीची सही किंवा साक्ष रेकार्डवर दिसून येत नाही. सदर संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १२ लाख २५ हजार रुपये मानधनापोटी वाटप केल्याचे रेकार्डवर नमूद आहे. परंतु, सदर मानधन वाटप केल्याचे मूळ प्रमाणके रेकार्डवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे संचालकांनी कट रचून चुकीचे ताळेबंद पत्रक तयार करून एकूण एक कोटी १७ लाख ९५ हजार ७२० रुपयांची अफरातफर केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संचालकांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक भूषण बुराडे करीत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे
विनोद मंगरू कागदीमेश्राम (वय ६०, रा. कोटरा, ता. सालेकसा), धनराज परसराम शेंडे (वय ४५, रा. लोहारा, ता. देवरी), संजय कागदीमेश्राम (रा. कोटरा), गुजोबाजी बारूक मेश्राम (वय ७८, रा. कोटरा), आत्माराम भुते (वय ५५, रा. कोटरा), देवेंद्र हरिश्चंद्र कोटांगले (रा. कोटरा), भीमराज मरस्कोल्हे (रा. सिंगाटोला कोटरा), प्रेमलाल मोतीराम मेश्राम (रा. हेटीटोला), रघुनाथ बिसन मोरदेवे (रा. चिचटोला), पुरुषोत्तम चैतराम ढवरे (रा. सोनारटोला, ता. देवरी) व एक महिला (रा. मुल्ला, ता. देवरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.