23.2 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home राजकीय अमरावती महापालिकेत महिला राज; चारही विषय समित्यांवर महिलांचीच वर्णी

अमरावती महापालिकेत महिला राज; चारही विषय समित्यांवर महिलांचीच वर्णी

0
42

अमरावती-अमरावती महानगरपालिकेच्या चार महत्त्वाच्या विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली असून, यामध्ये महिला नगरसेविकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी महिलांची वर्णी लागली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
​या निवडीनुसार, विधी समितीच्या सभापतीपदी सौ. स्नेहा आशिष लुल्ला तर उपसभापतीपदी डॉ. मधुरा मिलिंद कहाळे यांची निवड करण्यात आली आहे. शहर सुधार समितीच्या सभापतीपदाची धुरा सौ. राधा राजू कुरील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, श्रीमती सुमती विजय ढोके यांची उपसभापती म्हणून वर्णी लागली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समितीच्या सभापतीपदी ॲड. प्रिती हर्षल रेवणे तर उपसभापतीपदी सौ. वंदना प्रदीप मडघे यांची निवड झाली आहे. तसेच, अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. ममता संदीप आवारे आणि उपसभापतीपदी सौ. लता रावसाहेब देशमुख यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
​या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी सभागृह नेते चेतन गावंडे यांच्यासह विविध पक्षांच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी नूतन सभापतींचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.