साकोली- तालुक्यात येणाऱ्या बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. या वाघिणीच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वाघिणीचा वावर असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून, प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी साकोली-तिरोडा मार्ग रोखून धरला.
१९ मार्च रोजी बांपेवाडा येथील ५० वर्षीय वसंता मेश्राम यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, २८ मार्च रोजी उमरझरी येथील ४८ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने यांच्यावर वाघिणीने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात माया सोनवाने गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. एकामागून एक होत असलेल्या या प्राणघातक हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात नरभक्षक वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली आहे.जखमी माया सोनवाने यांना वेळेत मदत आणि उपचार न मिळाल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला.
वन विभागाची शोधमोहीम तीव्र
घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात आला असून विशेष रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली आहे. वाधिणीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात तात्पुरता टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, नरभक्षक वाघीण दिसताच तिला ट्रॅक्विला-यझर गनद्वारे बेशुद्ध करून पकडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत





