25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक ‘या’ तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

‘या’ तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

0
159

गोंदिया,दि.३०- एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी देण्यात येणार असून, पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा यंदा एकाच दिवशी सुरू होणार आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळांमधील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकसमानता आणि सुसंगती राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

या सूचनेनुसार राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र इतर मंडळांच्या शाळांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार वर्ग सुरू असतील किंवा काही महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असतील, तर अशा शाळांमधील सुट्टीबाबतचा निर्णय संबंधित शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर घेण्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विदर्भासह राज्यातील सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत. विदर्भातील उन्हाळ्यातील जास्त तापमानाचा विचार करून तेथील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११. ४५ या वेळेत भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३० जूनपासून शाळा नियमित वेळेत सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.
राज्यभरात एकसमान वेळापत्रक

यापूर्वी विदर्भातील तापमान आणि उष्णतेमुळे त्या विभागातील शाळा राज्यातील इतर भागांपेक्षा साधारण आठ ते दहा दिवस उशिरा सुरू केल्या जात होत्या. मात्र यंदापासून वेळापत्रकात बदल करून राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनला एकाच दिवशी सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विदर्भात मात्र उष्णतेचा विचार करून सुरुवातीच्या कालावधीत सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची सवलत देण्यात आली आहे. असे गोसावी यांनी सांगितले.

blank