नागपूर,दि.३०- बालाघाटहून इतवारीकडे येणारी मेमू गाडी रविवारी रात्री कलमना-कामठी दरम्यान रुळावरून घसरली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालीघटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ६८७१५ क्रमांकाची बालाघाट-इतवारी मेमू गाडी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास कलमना-कामठी दरम्यान किमी ११२०/९-१० या ठिकाणी रुळावरून घसरली. या घटनेत इंजिनामागील पहिल्या दोन डब्यांच्या पुढील चाकांनी पटरी सोडली. संबंधित गाडी चौथ्या मार्गिकेवरून धावत असल्याने तिचा वेग तुलनेने कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघाताच्या काही क्षणांपूर्वी गाडीच्या चाकांना एखाद्या कठीण वस्तूची जोरदार धडक बसल्याचा आवाज प्रवाशांना ऐकू आल्याचे सांगण्यात आले. या आवाजानंतर अचानक हलकासा धक्का बसल्याने प्रवासी काही काळ घाबरले होते. मात्र, गाडी तत्काळ थांबविण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.





