गोरेगाव,दि.३१- येथील पीएमश्री शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर लोंढे यांच्यावर भ्रष्टचाराचा आरोप करीत कारवाईच्या मागणीला घेऊन शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी सोमवारी सकाळी ७.३० वाजतापासून शाळाबंद आंदोलन पुकारले. जिल्हा प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्राचार्य लोंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
प्राचार्य लोंढे यांच्यावर महाविद्यालयात आर्थिक घोळ केल्याचे आरोप करीत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी तक्रारी केल्या. ३० डिसेंबर २०२५ रोजी शाळाबंद आंदोलन छेडण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कारवाई होत नसल्याचे पाहून पालकांनी पुन्हा सोमवारी सकाळपासून शाळाबंद आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची दखल घेत जि.प. शिक्षण विभागाकडून सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ मागितली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता प्राचार्य लोंढे पांना तत्काळ प्रभावाने निलंबित करीत असल्याचे पत्र जारी केले.
पत्रानुसार लोंढे यांच्या विरोधात ३० डिसेंबर २०२५ रोजीचे आंदोलन व तक्रारीची दखल घेत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीकडून १९ जानेवारी रोजी अहवाल प्राप्त झाला. चौकशी अहवालात मुख्याध्यापक लोंढेविरूद्ध बहुतांश आरोप सिद्ध होत असल्याने कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. त्या अनुषंगाने मुख्याध्यापक लोढे यांच्यावर तत्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे नमूद आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या घा कारवाईचे शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे.





