गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत धावणाऱ्या चांदा फोर्ट–गोंदिया व बालाघाट पॅसेंजर गाड्यांच्या सातत्याने होणाऱ्या उशिराबाबत DRUCC सदस्य विनोद (गुड्डू) चांदवानी यांनी महाप्रबंधक मा. तरुण प्रकाश यांना निवेदन देऊन तीव्र चिंता व्यक्त केली.यावेळी DRUCC सदस्य लखमीचंद रोचवानी तसेच सामाजिक कार्यकर्ते मुकेश डुबानी उपस्थित होते.
चांदवानी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, चांदा फोर्ट–गोंदिया पॅसेंजर गाडी ही चंद्रपूर व गोंदिया या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी स्वस्त व सर्वसामान्यांसाठी उपयुक्त वाहतूक सेवा आहे. या गाडीवर गरीब व मध्यमवर्गीय नागरिक, विद्यार्थी तसेच रोजगाराशी संबंधित युवक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. या मार्गावर सुमारे 26 थांबे असून 100 हून अधिक गावांतील नागरिकांचे दैनंदिन प्रवास या गाडीवर अवलंबून आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, कोविड काळानंतर ही गाडी सतत 3 ते 4 तास उशिराने धावत आहे. विशेषतः नवेगाव, सौंदड व गणखैरा स्थानकांवर गाडी 1 ते 2 तास अनावश्यकपणे उभी ठेवली जाते, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.याचप्रमाणे, बालाघाट पॅसेंजर गाडी देखील सातत्याने उशिराने धावत असून, त्यामुळे दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी व रुग्ण यांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचण्यात अडचणी येत आहेत आणि त्यांच्या कामांवर परिणाम होत आहे.चांदवानी यांनी महाप्रबंधकांना विनंती केली आहे की, या दोन्ही पॅसेंजर गाड्यांच्या वेळपालनात सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.





