
दोन अव्वल कारकून प्रतिनियुक्तीवर: कनिष्ठ लिपिकाच्या चार जागा रिक्त
गडचिरोली दि.१७-गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या देसाईगंज तहसील कार्यालयात सध्या मुख्य टेबलावरील एकुण सात पदे भरलेली नसून रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. गौण खनिज उत्खनन व जमीन शाखेत अर्ध न्यायिक कामकाज शिपाई पदावरील एक कर्मचारी हाताळत असल्याची धक्कादायक तेवढीच खळबळजनक माहिती पुढे आली असल्याने मागील एक वर्षापासून जमीनी संदर्भात पारित आदेशान्वये प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सह अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उप जिल्हाधिकारी आशिष वानखेडे, उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील बेलपत्रे यांच्यासह जवळपास २५-३० अधिकारी व कर्मचारी एवढ्या ताफ्यासह दि.८ मार्चला दाखल झाले होते. या दरम्यान मागील दोन वर्षांपासून बेधडक सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन, जमिन शाखेतील प्रलंबित प्रकरणे तहसीलदार दौरा दैनंदिन अहवाल सादर न करणे, नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे, अनेक महसूल प्रकरणे निकाली न काढता प्रलंबित ठेवणे, तलाठी, मंडळ अधिकारी व स्वस्त धान्य दुकान यांचे दप्तर न तपासता दिरंगाई निष्काळजीपणा केल्याचे अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्या निदर्शनास आले असल्याचे बोलले जात आहे . संजय गांधी निराधार योजनेच्या रोकड वहीत मोठ्या प्रमाणात त्रुट्या आढळले असून आर्थिक अनियमितता असल्याने देसाईगंज तहसील कार्यालया प्रमुख यांना जिल्हा प्रशासनाने चांगलेच धारेवर धरून कागदपत्राची तपासणी करून विभाग प्रमुखांवर ताशेरे ओढण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
देसाईगंज तहसील कार्यालयात चार नायब तहसीलदार पदे मंजूर असून तीनच नायब तहसीलदार आहेत, पाच पदे सहायक महसूल अधिकारी करिता मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे ही प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली आहेत. कनिष्ठ लिपिकांची एकूण दहा पदे मंजूर असून केवळ सहाच पदे भरलेली आहेत. शिपाई पदासाठी एकूण ४ पदे मंजूर असून चारही पदे भरलेली आहेत. सध्या तरी देसाईगंज तहसील कार्यालयात एकुण ७ पदे रिक्त असून तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यास एक शिपाई मागील वर्षभरापासून गौण खनिज उत्खनन व जमीन शाखेतील अर्ध न्यायिक कामकाज हाताळत असल्याची माहिती पुढे आली आहे. या शिपायाला तहसीलदार यांनी मुद्दाम बसवले की आणखी काही असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
तहसीलदारही दिर्घ रजेवर
देसाईगंज येथील तहसिलदार प्रिती दुडूलकर ह्या १० मार्च पासून दिर्घ रजेवर गेले असून याचा प्रभार नायब तहसीलदार नंदकिशोर कुमरे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आले आहे. हे नायब तहसीलदार या शिपायाला गौण खनिज उत्खनन व जमीन शाखेतील अर्ध न्यायिक कामकाज हाताळण्यासाठी लावतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




