लोधी समाजामधील हे नेत्रदान ठरले समाजासाठीचे प्रेरणास्रोत
गोंदिया -शहरातील टि.बी.हॉस्पीटलच्या मागील टि.बी.टोली कॉलनीतील मनोहर प्रसाद भैयालाल दमाहे (वय ७४) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी नंदा देवी दमाहे व त्यांचे कुटुंबीयांनी घेतलेला नेत्रदानाचा मोठा निर्णय लोधी समाजासाठी आदर्श उदाहरण ठरला आहे.या दु:खाच्या काळातही माणुसकीला सर्वोपरि ठेऊन नेत्रदान केले आहे. या उदात्त हेतूने नेत्रदानामुळे एखाद्याला नवा प्रकाश मिळण्याची आशा तर दिलीच, शिवाय समाजात नेत्रदानाविषयी जनजागृती आणि प्रेरणा देण्याचा संदेशही दिला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पाटले यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले नागपुरे यांच्याशी दमाहे कुटुंबीयांनी संपर्क साधून डॉ.अमित इलमकर यांनी नेत्रदानाच्या प्रक्रियेला गती दिली.हे नेत्रदान केवळ एक परोपकाराचे कृत्य नाही, तर ते एका दृष्टिहीन व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करण्याचे माध्यम ठरले आहे. विशेष म्हणजे, लोधी समाजामधील हे पहिलेच नेत्रदान ठरले असून, त्यामुळे ते संपूर्ण समाजासाठीच एक प्रेरणास्रोत बनले आहे.
दमाहे कुटुंबातील सदस्य त्यात पत्नी नंदा देवी दमाहे आणि त्यांचे तीन पुत्र कमलेश दमाहे,उमेश दमाहे व भूमेश दमाहे यांनी नेत्रदानासाठी आपली संमती दिली.डॉ.अपूर्वा जैन, डॉ.हेमंत त्यांचे सोबत रीटा विजय अरोरा यांनी, भाविका बघेले/नागपुरे यांच्यासह, नेत्रदान प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य केले. के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागाकडुन शासनामार्फत नेत्रदान केल्याबद्दल परिवाराला प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.या कार्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी मनोहर प्रसाद भैयालाल दमाहे त्यांच्या पत्नी नंदा देवी दमाहे व कुटुंबीयांनी घेतलेला नेत्रदानाचा आदर्श लोकांनी डोळ्यासमोर ठेवुन नेत्रदान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन समस्त गोंदियावासियांना केलेले आहे.





