40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय महिला आरक्षणावरून भाजपच्या उलट्या बोंबा महिला कॉंग्रेस कमिटीचे प्रत्युत्तर

महिला आरक्षणावरून भाजपच्या उलट्या बोंबा महिला कॉंग्रेस कमिटीचे प्रत्युत्तर

0
74

blank

: देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप

गोंदिया,—. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यसभा आणि लोकसभेत प्रस्ताव एकमताने पारीत झाला. राजकीय आरक्षणाचा पायंडाच कॉंग्रेसने घातला आहे. आधीच पारीत झालेल्या प्रस्तावाला कायद्याचे स्वरूप देण्यात आले नाही. उलट महिला आरक्षणाची आड घेवून सत्ताधारी भाजपने चुकीच्या परिसिमनाचा प्रस्ताव पारीत करण्याचा कुटील डाव रचला होता. तो डाव विरोधी पक्षाने हाणून पाडला. सत्ताधारींचा डाव उधळून लावल्यामुळे आता भाजप कॉंग्रेसवर खोटा आरोप करत असून हा चोरांच्या उलट्या बोंबा असाच प्रकार असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे यांनी केला.
येथील शासकीय विश्रामगृहात त्या आज, २४ एप्रिल रोजी पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, अमर वराडे, राजेश चांदेवार, राजू काळे, विमल कटरे आदी उपस्थित होते. वंदना काळे म्हणाल्या, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्थेत आरक्षण लागू केले. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले. ते आरक्षण आता महाराष्ट्रात ५० टक्क्यांवर आहे. कॉंग्रेसने नेहमीच महिला नेतृत्वाला स्थान दिले. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि पक्षाचे अद्यक्षपद देखील महिलांना दिले. उलट भाजप दुटप्पी भूमिका खेळत असून त्यांनी आजपर्यंत महिलांना दुय्यम लेखले आहे. लोकसभा आणि राज्यसभेत २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक पारीत झाले असताना त्याला लागू करण्यात आले नाही. उलट महिला आरक्षणाच्या आड चुकीचे परिसिमन करण्याचा डाव रचण्यात आला होता. त्या परिसिमनात ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती यांच्यावर अन्याय होणार होता. त्यामुळे परिसिमन बिल नाकारल्यामुळे सत्ताधारी भाजपची नाचक्की झाली. त्यामुळे त्यांचे मनसुबे हाणून पडल्याने आता कॉंग्रेसवर खोटे आरोप करत आहेत. भाजपमध्ये जराही महिलांप्रती निष्ठा असेल तर २०२३ मध्ये पारीत झालेले विधेयकाचे कायद्यात रुपांतर करावे, कॉंग्रेस त्याचे समर्थन करेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

blank